‘ड्रग्ज पार्टी’ प्रकरणात नवा ट्विस्ट; प्रांजल खेवलकर निर्दोष ठरले

0
112

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | पुणे :
खराडी येथील एका हॉटेलमध्ये उघडकीस आलेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात भाजप नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या रक्त तपासणीचा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांच्या हाती लागला असून त्यात ड्रग्जचे सेवन झाल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.


जुलै महिन्याच्या अखेरीस पुण्यातील खराडी परिसरातील एका नामांकित हॉटेलमधील खोलीत मध्यरात्री पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता हॉटेलमध्ये दारू, अमली पदार्थ व हुक्क्याचा वापर सुरू असल्याचे समोर आले. या कारवाईत दोन तरुणींसह सात जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यामध्ये प्रांजल खेवलकर यांचाही समावेश होता.


या छाप्यात पोलिसांनी २ ग्रॅम ७० मिलिग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजासदृश पदार्थ, हुक्का पात्र, दहा मोबाइल फोन, सुगंधी तंबाखू, दोन कार व दारूच्या बाटल्या असा मोठा मुद्देमाल हस्तगत केला होता. यानंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली.


घटनेनंतर पोलिसांनी सर्व आरोपींचे रक्त नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. नुकताच आलेल्या अहवालानुसार प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर आरोपींनीही ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रकरणाचा तपास आता वेगळ्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. खडसे कुटुंबाचे नाव गुन्हेगारी प्रकरणात जोडले गेल्याने विरोधकांकडूनही टीकास्त्र डागण्यात आले होते. मात्र, फॉरेन्सिक अहवालात ड्रग्ज सेवन नकारात्मक आल्याने खेवलकर यांना दिलासा मिळाला असून या प्रकरणात त्यांची गुंतवणूक कितपत गंभीर आहे, याबाबत आता नवीन प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.


पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाच्या आधारे तपास सुरू असून, नेमके कोण ड्रग्ज आणले, त्याचा पुरवठा कसा झाला, याचा तपास सुरू आहे. अहवालानंतर काही आरोपींना दिलासा मिळाला असला तरी ड्रग्ज पार्टीतील आयोजक कोण होते, याबाबत पोलिसांचा तपास अधिक गती घेण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here