
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
न्यायासाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या आणि घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये अनेक महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या एका महिला वकिलेलाच अखेर वैवाहिक हिंसाचाराच्या जाळ्यातून मृत्यूला सामोरे जावे लागले. पवईतील अंधेरी-कुर्ला रोडवरील रहेजा विहार या उंच इमारतीत शनिवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. ६० वर्षीय राजीव चंद्रभान या निवृत्त एअर इंडिया कर्मचाऱ्याने आपल्या ५४ वर्षीय पत्नी सावित्रीदेवी यांची उशीने नाक दाबून हत्या केली.
राजीव आणि सावित्रीदेवी यांचा विवाह १९९५ मध्ये झाला होता. परंतु, काही वर्षांतच त्यांचे वैवाहिक जीवन विसंवादाने भरकटले. १९९७ पासून पती-पत्नी वेगवेगळे राहत होते. सावित्रीदेवी या पवईतल्या रहेजा विहार सोसायटीत एकट्या राहत होत्या. शनिवारी रात्री राजीव काही दस्तऐवज घेण्यासाठी त्यांच्या घरी गेला. संभाषणादरम्यान त्याने पुन्हा एकत्र राहण्याची मागणी केली. मात्र, सावित्रीदेवींनी स्पष्ट नकार दिल्याने वाद वाढला. वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि रागाच्या भरात राजीवने उशी तोंडावर दाबून पत्नीची हत्या केली.
हत्या करून राजीव मध्यरात्री दीडच्या सुमारास घर सोडून गेला. पण, घाईत त्याने आपला मोबाइल फोन आणि कारच्या चाव्या तिथेच विसरून दिल्या. या वस्तू घेण्यासाठी तो पुन्हा घटनास्थळी आला. त्याच वेळी शेजाऱ्यांनी घराचे दार उघडे असल्याचे पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली. रात्री दोनच्या सुमारास पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सावित्रीदेवींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सावित्रीदेवी यांच्या फ्लॅटमधील सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळी राहिलेला मोबाइल आणि कारच्या चाव्या या महत्त्वाच्या पुराव्यांवरून पोलिसांचा संशय राजीववर गडद झाला. चौकशीदरम्यान सुरुवातीला गोंधळ घालणाऱ्या राजीवने अखेर कसून विचारपूस केल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली.
सावित्रीदेवी या व्यवसायाने वकील होत्या आणि त्यांनी आपल्या कारकिर्दीत घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांत अनेक महिलांना न्याय मिळवून दिला होता. परंतु, नियतीने त्यांच्यासमोरच अशा हिंसाचाराचे बळी होण्याची वेळ आणली. या घटनेने वकील आणि महिला हक्क चळवळीशी संबंधित मंडळींमध्ये संताप व हळहळ व्यक्त होत आहे.
आरोपी राजीव चंद्रभान याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवई पोलिस अधिक तपास करत आहेत.