
माणदेश एक्सप्रेस न्युज | डोंबिवली –
डोंबिवली शहरात बुधवारी झालेल्या एका नाट्यमय प्रकारामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांना भाजप कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर साडी नेसवून अपमानित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा साडी परिधान केलेला फोटो व्हायरल झाल्याच्या निषेधार्थ भाजपने ही कारवाई केली. या घटनेनंतर डोंबिवलीपासून कल्याणपर्यंत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
डोंबिवलीतील ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रकाश पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा साडीतील एक फोटो सोशल मीडियावर फॉरवर्ड केला होता. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी प्रकाश पगारे यांचा शोध घेतला आणि थेट भररस्त्यातच त्यांना साडी नेसवली. भाजपकडून या निषेधाला ‘साडी सत्कार’ असं नाव देण्यात आलं.
भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब म्हणाले की, “पंतप्रधानांचा अपमान करणारी पोस्ट टाकणे निंदनीय आहे. भाजप हा प्रकार अजिबात सहन करणार नाही. म्हणूनच साडी नेसवून निषेध नोंदवला आहे. पुन्हा असा प्रकार झाल्यास भाजप स्टाईलने उत्तर दिलं जाईल.”
कारवाईपूर्वी भाजपकडून मानपाडा पोलिस ठाण्यात लेखी अर्ज दिल्याची माहितीही देण्यात आली.
या घटनेनंतर काँग्रेसमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. काँग्रेस नेते प्रकाश पगारे यांनी स्पष्ट केले की, “मी फक्त पोस्ट फॉरवर्ड केली होती. भाजपने जातीवाचक शिवीगाळ केली, दबाव आणला. पण मी डगमरणार नाही. काँग्रेससाठी प्राणही गेला तरी चालेल, पण या गुन्हेगारांना धडा शिकवणार.”
काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनीही कठोर शब्दांत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “72 वर्षांच्या ज्येष्ठ नेत्याला रस्त्यावर साडी नेसवून अपमान करणं हे लाजिरवाणं कृत्य आहे. आम्ही विरोधकांविरोधात आंदोलन केलं, पण कधीही अशा प्रकारे मारहाण किंवा अपमान केला नाही. भाजपकडे हिंमत असेल तर मूळ पोस्ट करणाऱ्यांना सामोरे जावे, निर्दोष नेत्यांवर दबाव आणू नये.”
या घटनेनंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने डीसीपी कार्यालयात भेट देऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी चर्चा सुरू असताना ज्येष्ठ नेते मामा पगारे यांचा रक्तदाब वाढल्यामुळे ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं.
या प्रकरणामुळे डोंबिवली, कल्याण परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण आहे. काँग्रेसकडून भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी मात्र अद्याप अधिकृत कारवाई केलेली नाही.
या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेस–भाजप आमनेसामने आले असून, आगामी दिवसांत राजकीय वर्तुळात या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.