
माणदेश एक्सप्रेस न्युज | पंढरपूर :
पंढरपूरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागा नदीला प्रचंड पूर आला असून नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. परिणामी पंढरपूरातील ऐतिहासिक मंदिरे, घाट परिसर तसेच ब्रिटिशकालीन दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. अवघ्या दोन महिन्यांत चौथ्यांदा पूरस्थिती निर्माण झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
शहराला जोडणारा ऐतिहासिक दगडी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाने लाल इशारा जारी करत नदीकाठच्या गावांना तातडीने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
चंद्रभागेच्या काठावरील पुंडलीक मंदिरासह अनेक मंदिरे पाण्याने वेढली गेली आहेत. मंदिरांच्या सभोवती तीन ते चार फूट पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंदिरातील दानपेट्या, पूजेची साहित्ये, भिंती व इतर भागाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. नेमके नुकसान किती झाले आहे याचा अंदाज प्रशासनाला अद्याप घेता आलेला नाही.
पंढरपूरात अवघ्या दोन महिन्यांत चौथ्यांदा महापूर आला आहे. पावसाचा जोर काही दिवसांपासून सतत सुरू आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागेची पातळी झपाट्याने वाढली. त्यामुळे पंढरपूर आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पूरस्थिती लक्षात घेता बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. पंढरपूर शहरातील घाट परिसर, नदीकाठची वसाहत तसेच तटबंदी लगतची घरे रिकामी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणं टाळावं, असा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
अचानक आलेल्या पुरामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घरातील साहित्य, जनावरे आणि शेती यांचं मोठं नुकसान झाल्याची हाकाही शेतकरी आणि गावकऱ्यांकडून येत आहे.
पंढरपूरातील ही भीषण पूरस्थिती नेमकी किती दिवस राहणार आणि आणखी किती नुकसान होणार, हे येणाऱ्या काही दिवसांतल्या पावसावर अवलंबून आहे. मात्र, दोन महिन्यांत चौथ्यांदा आलेल्या महापुरामुळे पंढरपूरकरांच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठं संकट ओढावलं आहे.