
माणदेश एक्सप्रेस न्युज | मुंबई –
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेला उधाण आलं आहे. प्रकृतीच्या कारणास्तव काही महिन्यांपूर्वी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, पुन्हा त्यांना मंत्रिपद मिळणार का, यावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेला ऊत आला आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे भावनिक आवाहन करत “आता आम्हाला रिकामं ठेवू नका, जबाबदारी द्या” अशी मागणी केली होती.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यामागे दिल्लीतील आदेश कारणीभूत आहेत. यामध्ये अजित पवारांची फारशी भूमिका नाही. हे सर्व अमित शाह ठरवतात,” असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले,
“धनंजय मुंडे यांच्यावरील आक्षेप विशिष्ट प्रकरणापुरते मर्यादित आहेत. मात्र, मंत्रिपदाबाबतचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी घ्यायचा असतो. तरीदेखील, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाचे मूळ मालक दिल्लीमध्ये बसले आहेत. दिल्लीतील आदेशावरूनच महाराष्ट्रातील मंत्रीमंडळाचे निर्णय घेतले जात आहेत. अमित शाह यांच्या आदेशामुळेच धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं. त्यामुळे पुढे त्यांचं काय करायचं हे देखील दिल्लीतील निर्णयावर अवलंबून आहे.”
दरम्यान, रायगड येथे खासदार सुनील तटकरे यांच्या सत्कार सोहळ्यात धनंजय मुंडेंनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले,
“माझ्या राजकीय प्रवासात वडील नसताना मला सुनील तटकरे यांचा मोठा आधार मिळाला. आज मी जे काही आहे ते त्यांच्या आशीर्वादामुळे आहे. त्यांनी कायम मार्गदर्शन केलं. त्यामुळेच त्यांना हा सन्मान मिळाला आहे. पण आता माझ्या हाताला काहीतरी काम द्या. आम्ही चुकलो तर कान धरा, पण आम्हाला रिकामं ठेवू नका, जबाबदारी द्या.”
राजकारणात सक्रिय आणि ताकदीचा नेता म्हणून ओळख असलेल्या मुंडेंचे मंत्रिपदावर पुनरागमन होईल का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. परंतु संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे या चर्चेला नवा कलाटणी मिळाली आहे. पुढचा निर्णय खरोखरच दिल्लीतूनच ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.