
माणदेश एक्सप्रेस न्युज | नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे जामिया नगर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. एका बंद फ्लॅटमध्ये तब्बल तीन दिवसांपासून महिलेचा मृतदेह पडलेला असून तिचा मुलगा मात्र मृतदेहाजवळच शांतपणे बसून असल्याचं उघड झालं आहे. या घटनेनं परिसरातील रहिवासीच नव्हे तर पोलिस अधिकारी देखील हादरले आहेत.
जामिया नगरमधील या फ्लॅटमधून अनेक दिवस कोणताही आवाज, हालचाल किंवा वावर दिसून न आल्याने शेजाऱ्यांच्या मनात संशय निर्माण झाला. शेवटी त्यांनी पोलिसांना याबाबत कळवलं. पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. फ्लॅटचा दरवाजा उघडताच त्यांना आतलं दृश्य पाहून धक्का बसला. महिलेचा मृतदेह खोलीत पडलेला होता, तर तिचा मुलगा जवळच बसलेला होता.
प्राथमिक तपासात महिलेचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचा खरा कारण समजू शकेल.
महिलेच्या मृत्यूनंतरही मुलगा फ्लॅटमध्येच मृतदेहाजवळ बसलेला का होता, त्याने आईच्या मृत्यूची माहिती बाहेर का दिली नाही, या प्रश्नांवर आता पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवले आहे. त्याच्या मानसिक स्थितीबाबतही डॉक्टरांचा अहवाल घेण्यात येणार आहे.
या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेजाऱ्यांचा म्हणणं आहे की, त्या घरातून गेल्या काही दिवसांत कोणताही आवाज किंवा हालचाल होत नव्हती. यामुळेच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी फ्लॅट सील करून पुढील चौकशी सुरू केली आहे.
जामिया नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सर्वांगीण तपास करत आहेत. मृत्यू स्वाभाविक आहे की त्यामागे काही संशयास्पद कारण दडले आहे, याचा उलगडा पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच होणार आहे.