
माणदेश एक्सप्रेस न्युज | अंबरनाथ :
आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासाठी खास तयारीचा मास्टरप्लॅन आखल्याचे स्पष्ट झाले आहे. अंबरनाथ येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश देत आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेल्या सर्वात महत्त्वाच्या सूचनांपैकी एक म्हणजे मतदार याद्यांवर लक्ष ठेवणे.
“गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतचोरी झाली. यापुढे असे प्रकार घडू नयेत, यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या-आपल्या प्रभागातील मतदार याद्या तपासाव्यात. त्यातील त्रुटी शोधून काढा आणि दूर करा. कुठलाही संशयास्पद प्रकार दिसल्यास त्याची नोंद घ्या.”
असे ठणकावून सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
राज ठाकरेंनी पुन्हा एकदा ईव्हीएम प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितले की, अनेकांच्या मनात निवडणुका पारदर्शकपणे होत नाहीत, असा संशय आहे. मतदार याद्यांवर काटेकोर काम केले, तर कुठल्याही गैरप्रकारांना आळा घालता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मेळाव्यात राज ठाकरेंनी पक्षातून बाहेर पडलेल्या पदाधिकाऱ्यांबद्दल कठोर भूमिका घेतली.
“जे गेले ते आपलेच नाहीत,”
असे म्हणत त्यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. या भूमिकेमुळे पक्षात एकीची भावना निर्माण झाली असून, कार्यकर्त्यांना नव्याने उभारी मिळाली आहे.
राज ठाकरेंच्या अंबरनाथ दौऱ्यापूर्वी शहरात लागलेल्या एका बॅनरने जोरदार चर्चा रंगवली. या बॅनरवर राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो होता. त्यावर लिहिले होते – “महाराष्ट्रात फक्त ठाकरेच…”
या बॅनरमुळे दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अचानक कारवाई सुरू केली. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात धडक मोहीम राबवण्यात आली. प्रशासनाच्या या हालचालीमुळे स्थानिकांमध्ये चर्चा रंगली की, “प्रशासनाला जाग येण्यासाठी राज ठाकरे यांचा दौरा लागतो का?”
या मेळाव्यात राज ठाकरेंचे ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनी स्वामी समर्थ चौक परिसरात मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. या वेळी माजी आमदार राजू पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
राज ठाकरेंच्या थेट आदेशांमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाचा संचार झाला असून, आगामी महापालिका निवडणुकांसाठी पक्ष पूर्ण ताकदीने रिंगणात उतरण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत.