
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाने राज्यातील वातावरण तापलं आहे. या वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटत असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी आंदोलनं होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पडळकरांना फोन करून “अशी विधाने करू नका” अशी सक्तीची सूचना केल्याची माहिती पडळकरांनीच दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गोपीचंद पडळकर म्हणाले,
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला होता. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की अशी वक्तव्य करु नका. त्यांच्या सूचनेचे पालन मी करणार आहे. पुढे जाऊन अशा प्रकारची चूक माझ्याकडून होणार नाही.”
मुख्यमंत्र्यांच्या या थेट हस्तक्षेपामुळे भाजपच्या वर्तुळात पडळकर यांना आळा घालण्यात आला आहे, असे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
फडणवीसांकडून सूचना मिळाल्यानंतरही पडळकरांनी आपली बाजू मांडताना शरद पवारांवर पलटवार केला. ते म्हणाले,
“जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रींवर खालच्या शब्दात टीका केली होती, तेव्हा मी पवारांना फोन केला होता का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दलही AI व्हिडीओ तयार करण्यात आला. तेव्हा पवारांनी मोदींना फोन करून निषेध व्यक्त केला का? हे मला दाखवा.”
या संपूर्ण वादावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. पडळकरांच्या विधानाचा निषेध करताना ते म्हणाले,
“ज्या खालच्या थराला जाऊन टीका होत आहे, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशा वाचाळवीरांना आवरा. राजकारणाला काही मर्यादा असतात, त्या ओलांडू नयेत.”
जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल करताना गोपीचंद पडळकर म्हणाले होते,
“अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची धमक आहे, तुझ्यात नाही. माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे, येऊन बघ, तुझे डोळे दिपून जातील.”
या विधानामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी पडळकरांविरोधात निषेध नोंदवला जात आहे.
पडळकरांच्या विधानावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष चांगलाच चिघळला आहे. भाजपच्या अडचणींमध्ये वाढ होत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांना स्वत: यात हस्तक्षेप करावा लागला आहे. यापुढे पडळकरांना वादग्रस्त वक्तव्यांवर अंकुश ठेवावा लागणार आहे, असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.


