
माणदेश एक्सप्रेस न्युज | स्पोर्ट्स डेस्क
आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया आपली मजबूत कामगिरी कायम ठेवत असून, आगामी भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठ्या बदलांचे संकेत मिळत आहेत. 21 सप्टेंबर रोजी दुबईत होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी आज (19 सप्टेंबर) भारताचा सामना ओमानसोबत होत आहे. या सामन्यात टीम इंडियाने केलेल्या तयारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतीय संघाने गुरुवारी एक पर्यायी सराव सत्र (ऑप्शनल प्रॅक्टिस सेशन) आयोजित केले होते. या सरावात संघातील केवळ 9 खेळाडूंनी सहभाग घेतला. पण विशेष म्हणजे,
जसप्रीत बुमराह
शिवम दुबे
संजू सॅमसन
शुभमन गिल
अभिषेक शर्मा
आणखी एक वरिष्ठ खेळाडू
हे सर्व स्टार खेळाडू गायब राहिले. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा हे नेहमीच सराव सत्रात हजर राहतात, मात्र यावेळी त्यांचा गैरहजेरीचा मुद्दा चर्चेत आहे. या गोष्टीकडे पाहता संघ व्यवस्थापनाने काही मोठे धोरणात्मक बदल आखल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या सराव सत्रात युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसला. त्याने केवळ गोलंदाजीत नव्हे तर फलंदाजीतही आपली कौशल्ये दाखवली. त्यामुळे आज ओमानविरुद्धच्या सामन्यात त्याला पहिल्यांदाच प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते. जर त्याने ही संधी सोन्याहून पिवळी केली, तर पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या सामन्यातही त्याचे स्थान पक्के होण्याची दाट शक्यता आहे.
सराव सत्रात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने जोरदार मेहनत घेतली. अजूनपर्यंत त्याला आशिया कपमधील एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. बुमराहला आज विश्रांती दिल्यास अर्शदीपला खेळवले जाण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे, रिंकू सिंह आणि जितेश शर्मा या फलंदाजांनी नेट्समध्ये गाळलेला घाम पाहता त्यांच्याही संधी वाढल्या आहेत.
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ गट अ मध्ये अव्वल दोन स्थानावर आहेत. येत्या 21 सप्टेंबर रोजी दुबईत रात्री 8 वाजता पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
गेल्या रविवारी भारताने आबुधाबीमध्ये पाकिस्तानचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केला होता. त्यामुळे पाकिस्तान संघ बदला घेण्याच्या इराद्याने उतरेल, तर भारत पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल.