राजकारणात नव्या वादळाची चाहूल; पडळकरांचे वक्तव्य भाजपला भोवणार?

0
573

माणदेश एक्सप्रेस न्युज | सांगली :
राजकारणात पुन्हा एकदा शब्दांचा स्तर खालावल्याचे चित्र समोर आले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. एवढेच नाही तर पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करून त्यांच्या वडिलांबाबतही अवमानकारक वक्तव्य केले. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.


एका कार्यक्रमात बोलताना पडळकर यांनी जयंत पाटलांना उद्देशून अत्यंत खालच्या स्तराची भाषा वापरली.
अरे जयंत पाटला, तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला. तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून.” अशी टीका पडळकरांनी केली.

तसेच, “माणसं पाठवली, कशासाठी? गोपीचंद पडळकरने कुठल्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का? घ्या एखादा मधला व्यापारी आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा,” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.


काँग्रेस आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी ट्वीट करत पडळकरांवर जोरदार टीका केली.
“गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेचा आणि राजारामबापू पाटील कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा अवमान आहे. पडळकर यांनी वापरलेली भाषा ही स्तरहीन असून समाजातील सभ्यतेला पायदळी तुडवणारी आहे. भाजपच्या आमदाराने सार्वजनिक मंचावर अशी भाषा वापरणे हे महाराष्ट्राच्या परंपरेला कलंकित करणारे आहे. मी या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो,” असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.


राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पाटील यांनी देखील पडळकरांवर हल्लाबोल केला.
“ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेबांवर केलेली टीका ही अश्लाघ्य आणि संतापजनक आहे. या माणसाला बोलताना कधीही कुठलंही तारतम्य नसतं. भाजपच्या वरिष्ठांच्या पाठबळाशिवाय असे वक्तव्य होऊच शकत नाही. कुणाच्या घरापर्यंत जाण्याचा अधिकार यांना कुणी दिला? महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गाळात घालणाऱ्या या आमदाराच्या वक्तव्याचा भाजप निषेध करतो का, हे आता पहावं लागेल. निषेध नाही केला, तर पडळकर भाजपच्या फूसवर आहेत हेच खरे ठरेल,” असा इशाराही रोहित पाटील यांनी दिला.


पडळकर यांच्या वक्तव्यामुळे भाजपला बचावात्मक भूमिका घ्यावी लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधकांचा आरोप आहे की, जर भाजपने स्पष्ट भूमिका घेतली नाही तर पडळकर यांना पक्षाचेच समर्थन आहे, हे सिद्ध होईल.


संपूर्ण प्रकरणामुळे सांगली–इस्लामपूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जयंत पाटील यांचा राजकीय वारसा आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्या वक्तव्याचा राजकीय किंमत भाजपला मोजावी लागू शकते, अशी चर्चा सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here