
माणदेश एक्सप्रेस न्युज | इस्लामपूर :
“उद्या सकाळी बारात निघणार होती, बँडबाजा वाजणार होता, आयुष्याचा नवा अध्याय सुरू होणार होता…” पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. लग्नाच्या आदल्या दिवशीच झालेल्या भीषण अपघातात आकाश चंद्रकांत बाबर (वय 27, रा. पेठनाका, ता. वाळवा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र हर्षद बापू सकटे (वय 21, रा. पेठनाका) गंभीर जखमी असून त्याच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने इस्लामपूर शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मंगळवारी रात्री आकाश आपल्या मित्रासह रिल्स शूटिंग पाहण्यासाठी खांबे मळा परिसरात गेला होता. भावासह काही मित्र मंडळी रिल्स बनवत असल्याने तोही उत्सुकतेपोटी तिथे गेला. रात्री उशिरा दोघेही परतत असताना इस्लामपूर बसस्थानकासमोर समोरून भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने (एमएच 06 एएफ 4247) त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले गेले. आकाशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर हर्षद गंभीर जखमी झाला.
धडक दिल्यानंतर मोटारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. काहींनी त्याचा पाठलाग केला मात्र दत्त टेकडी परिसरात वाहन टाकून तो पसार झाला. मोटार चुकीच्या दिशेने चालवून झालेल्या या अपघातामुळे परिसरातील नागरिकांत प्रचंड संताप आहे.
आकाश हा सुरुळ येथील खासगी कंपनीत काम करत होता. बुधवारी त्याचा लग्नसोहळा होणार होता. मात्र लग्नाच्या आदल्या दिवशीच झालेल्या अपघाताने बाबर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मागे आई, वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे.
पेठ–सांगली रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाका ते प्रशासकीय इमारतीदरम्यान दुभाजकामधून अनेक ठिकाणी रस्ता ओलांडण्याची मोकळी जागा ठेवली आहे. त्यामुळे वाहनचालक चुकीच्या दिशेने भरधाव वेगात गाड्या चालवतात. या बेफिकिरीमुळे गेल्या चार महिन्यांत या मार्गावर चार जणांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातानंतर आकाशचा चुलत भाऊ प्रसाद बाबर याने इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.