
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | बीड :
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच आणि प्लॉटिंग व्यवसायिक गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजवली आहे. या प्रकरणी नर्तकी पूजा गायकवाडला पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पोलिस चौकशीतून रोजच नवनवीन खुलासे समोर येत असून, गोविंद बर्गे यांच्या आयुष्याचा वेदनादायी पट हळूहळू उलगडत चालला आहे.
गोविंद बर्गे यांना पत्नी, मुलं आणि स्थिर कुटुंब असूनही कलाकेंद्रातील २१ वर्षीय नर्तकी पूजा गायकवाडच्या प्रेमात ते गुंतले. पूजानेही त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचा पुरेपूर गैरफायदा घेतला, अशी माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे.
वर्षभराच्या काळात गोविंदने पूजासाठी महागडे मोबाईल, लाखोंचे दागिने, रोख पैसे, घरखरेदीसाठी मदत, अगदी एक प्लॉटही विकत घेऊन दिला. थोडक्यात, त्याने तिच्यावर अक्षरशः पाण्यासारखा पैसा उधळला. मात्र यानंतरही पूजाच्या मागण्या थांबल्या नाहीत. बंगल्याची मालकी, जमीन भावाच्या नावावर करण्याची मागणी ती सतत करत होती.
पोलिस चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, पूजा गोविंदला सतत ब्लॅकमेल करत होती. “माझं म्हणणं ऐकलं नाही तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन,” अशी धमकी तिने दिल्याचं स्पष्ट झालं आहे. या धमक्या आणि सततच्या मागण्यांमुळे गोविंद प्रचंड तणावाखाली आले होते.
घटनेच्या दिवशी गोविंदने पूजाला वारंवार फोन केले, व्हिडीओ कॉल केला, अगदी तिच्या सासुरे गावात जाऊन भेटण्याचाही प्रयत्न केला. मात्र पूजाने त्यांच्याशी बोलणं टाळलं. निराश झालेला गोविंद अखेर कारमध्ये मृतावस्थेत सापडला. त्यावेळी त्यांच्या खिशात केवळ ९०० रुपयेच होते. तसेच कारमध्ये बिअरचे काही कॅनही आढळले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी पूजाला ताब्यात घेतलं. सुरुवातीला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. काल कोर्टात हजर केल्यानंतर तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या आठवड्यात झालेल्या चौकशीत पूजाने गोविंदसोबतचे प्रेमसंबंध मान्य केले आहेत. त्याशिवाय ते दोघं विविध ठिकाणी – फ्लॅट, लॉज, कलाकेंद्र याठिकाणी एकत्र राहत असल्याचेही समोर आले आहे.
गोविंदच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिस तपास अधिक गतीमान करण्यात आला आहे. पूजासह तिच्या सहकाऱ्यांचे व मैत्रिणींचे जबाबही पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत.
घटनेनंतर बीडसह संपूर्ण मराठवाड्यात ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. “गोविंदच्या मृत्यूस जबाबदार कोण?” हा प्रश्न कायम आहे. पोलिस तपासात अजून कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


