
माणदेश एक्सप्रेस न्यूज | आटपाडी :
आटपाडी-भिवघाट रस्त्यावर सोमवारी (दि. 15) रात्री भिंगेवाडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात व्हॅनमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. वसंत उत्तम यादव (वय 43) आणि आर्यन मोहिते (वय 18, दोघेही रा. कालेटेक, ता. कराड, जि. सातारा) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संध्याकाळी साडेसातच्या सुमारास व्हॅन (क्र. एमएच 11 एके 8745) आटपाडीतून भिवघाटच्या दिशेने जात होती. आटपाडी बसस्थानकाजवळील सिद्धनाथ मंदिर परिसरात ही व्हॅन फिरोज लतीफ सय्यद यांच्या दुचाकीला धडकली. या धडकेत सय्यद जखमी झाले. दरम्यान, आपल्या मागावर पोलिसांचा ससेमिरा येईल, या भीतीने व्हॅन चालकाने वाहन अधिक वेगाने पुढे नेले.
भिंगेवाडी गावाजवळ आल्यानंतर समोरून आटपाडीच्या दिशेने वीट वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला व्हॅनने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत व्हॅन ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉलींच्या मध्ये घुसली. अपघात इतका भीषण होता की, व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्यामध्ये चालक वसंत यादव आणि सोबतीला असलेला आर्यन मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून व्हॅनचा पत्रा कापून आत अडकलेले दोन्ही मृतदेह बाहेर काढले. त्यांना उत्तरीय तपासणीसाठी आटपाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
या अपघाताची नोंद आटपाडी पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे भिंगेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.