
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | पुणे :
वादग्रस्त पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर आणि वडील पोलिसांना चकवून फरार झाले असून, ट्रकचालकाच्या अपहरण प्रकरणात मोठा धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. पुण्यातील चतुश्रृंगी परिसरातील खेडकर यांच्या घरात पोलिसांनी गेटवरून उड्या मारून प्रवेश केला; मात्र घरात कोणीच आढळून आले नाही. दरम्यान, घराच्या बाहेर दोन जेवणाचे डबे सापडले असून, ते कुणासाठी आणले गेले होते, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
शनिवारी (१३ सप्टेंबर) रात्री ऐरोली (नवी मुंबई) येथे मनोरमा खेडकरच्या कारला एका मिक्सर ट्रकने धक्का लागला. यानंतर संतापलेल्या मनोरमा खेडकरने ट्रकचालक प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्याला थेट पुण्यातील चतुश्रृंगी परिसरातील त्यांच्या घरात आणून कैद करून ठेवले.
अपहरण झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यासाठी रबाळे पोलिसांनी कार नंबरच्या आधारे चौकशी केली. त्यानंतर प्रल्हाद कुमारची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, जेव्हा पोलिसांनी सुरुवातीला ट्रकचालकाला सोडवण्यासाठी खेडकर यांच्या घरावर धडक दिली, तेव्हा मनोरमा खेडकरने पोलिसांशी वाद घालत कुत्रे सोडण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस माघारी फिरले.
यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल करून तिला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले. पण ती हजर झाली नाही. परिणामी सोमवारी दुपारी पोलिसांनी पुन्हा तिच्या घरी कारवाई केली.
पोलिस जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा मुख्य गेट बंद होते. पोलिसांनी गेटवरून उड्या मारून घरात प्रवेश केला. मात्र, घराचे दरवाजे आतून बंद होते. परिसराची पाहणी करून पोलिसांनी खात्री केली की घरात कुणी नाही. त्यानंतर घरावर नोटीस लावण्यात आली आणि पोलीस माघारी फिरले.
याचवेळी चौकशीअंती धक्कादायक माहिती समोर आली की, ज्या कारमधून ट्रकचालकाचे अपहरण झाले होते, त्याच कारमधून पूजा खेडकरचे आई-वडील फरार झाले आहेत. घराच्या बाहेर आढळलेले दोन जेवणाचे डबे मात्र पोलिसांसाठी नवे कोडे बनले आहे. घरात कोणीही नसताना हे डबे नेमके कुणासाठी आले होते? याचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी खेडकर दाम्पत्याच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत. मनोरमा खेडकर आणि तिच्या पतीविरुद्ध अपहरण, बेकायदेशीर कैद, सरकारी कामात अडथळा अशा गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पूजा खेडकर यांच्या कुटुंबाभोवती निर्माण झालेल्या वादांची मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता खेडकर दाम्पत्य कधी पोलिसांच्या जाळ्यात अडकणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.