
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे :
नवी मुंबईतील ऐरोली सिग्नलजवळ घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. ट्रकचा कारला झालेल्या अपघातानंतर कारमधून उतरलेल्या दोन लोकांनी थेट ट्रकचालकाला जबरदस्ती कारमध्ये बसवून नेलं आणि त्याचं अपहरण केलं. पोलिसांनी शोधमोहीम राबवून ट्रकचालकाची सुटका केली असून ही संपूर्ण घटना सरळसरळ पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर यांच्याशी संबंधित असल्याचं उघड झालं आहे.
ऐरोली सिग्नलवर ट्रकने एका कारला (एमएच १२ आरटी ५०००) धडक दिली. ही कार मनोरमा खेडकर यांची असल्याचं तपासात समोर आलं. धक्का लागल्यावर कारमधून दोन लोक उतरले आणि त्यांनी बळजबरी ट्रकचालकाला खाली उतरवलं. चालकाचं नाव प्रल्हाद कुमार असून तो मिक्सर ट्रक घेऊन जात होता. या घटनेनंतर चालक अचानक बेपत्ता झाला.
चालक बेपत्ता झाल्याची तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. कारच्या हालचाली शोधल्या असता ती थेट पुण्यातील चतुश्रृंगी परिसरातल्या मनोरमा खेडकर यांच्या घरी आढळली. यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी छापा टाकला. घराच्या आत तपास केला असता चालकाला डांबून ठेवलेलं असल्याचं दिसून आलं.
पोलिसांनी चालकाची सुरक्षित सुटका केली. मात्र चौकशीसाठी गेल्यानंतर मनोरमा खेडकर यांनी थेट पोलिसांशी हुज्जत घातली. त्यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला आणि कारवाईत अडथळा आणला. अखेर पोलिसांनी त्यांना समन्स बजावले असून पुढील तपास सुरू आहे.
पूजा खेडकर या आधीपासूनच वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून चर्चेत आहेत. आता त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या कृतीमुळे आणखी एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. साध्या अपघातानंतर अपहरण आणि पोलिसांना विरोध करणे ही वर्तणूक पाहता कायदेशीर कारवाई किती गंभीर पातळीवर होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.