
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | सोलापूर :
महाराष्ट्रात सध्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. एका नर्तकीच्या नादाला लागून गोविंद बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं. या घटनेनंतर सातत्याने नवनवीन खुलासे आणि चर्चांना उधाण येत आहे.
दरम्यान, संशयित नर्तकी पूजा गायकवाड हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तुरुंगात गेल्यानंतर चर्चेत आलेल्या या व्हिडीओमध्ये पूजाने स्वतःसाठी खास कॅप्शन दिलं आहे. इन्स्टाग्रामवर तिने स्वतःचा व्हिडीओ पोस्ट करत “बस्स तू ही मेरा है ‘S’…” असं लिहिलं आहे. त्यामुळे आता चौकशीदरम्यान पूजाच्या आयुष्यातील ‘S’ कोण? याची चर्चा जोरात सुरु आहे.
सोशल मीडियावर पूजाचे अनेक व्हिडीओ चर्चेत आहेत. यात ती गळ्यात मंगळसूत्र घातलेली दिसते. त्यामुळे हे मंगळसूत्र नेमकं कोणाच्या नावाचं आहे, पूजाचं लग्न झालं आहे का? की कुठल्या संबंधातून तिने हे मंगळसूत्र परिधान केलं आहे? अशा नव्या चर्चांनाही उधाण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा गायकवाड ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग येथील एका कला केंद्रात काम करते. याच ठिकाणी तिची भेट गोविंद बर्गे यांच्याशी झाली. ओळख वाढत गेली आणि अखेर या नात्याचं प्रेमात रुपांतर झालं. मात्र हे प्रेमच पुढे गोविंदसाठी जीवघेणं ठरलं.
चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, गोविंद यांनी पूजावर अक्षरशः पैसा खर्च केला. सोनं, फोन, प्लॉट, शेती अशा महागड्या भेटवस्तू तिला दिल्या. एवढंच नव्हे तर, घराची मागणी केल्यावर “तुला नवं घर बांधून देतो” असंही गोविंद म्हणाल्याचं सांगितलं जात आहे.
परंतु, नंतरच्या काळात या नात्यात कटुता निर्माण झाली. पूजा हिने गोविंद यांच्याशी बोलणं बंद केलं होतं. एवढंच नव्हे तर, तिने ‘गोराई येथील बंगला माझ्या नावावर कर आणि भावाच्या नावावर पाच एकर शेती लिहून दे, नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन’ अशी धमकी दिल्याचं बर्गे कुटुंबाने आरोप केले आहेत.
या धमक्या आणि दडपणामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या गोविंद बर्गे यांनी अखेर आपल्या कारमध्येच गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर सापडला. यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला असून पूजा गायकवाड सध्या पोलीस कोठडीत आहे.
पूजाच्या सोशल मीडियावरील ‘S’ नेमकं कोण?
तिने गळ्यात घातलेलं मंगळसूत्र कोणाच्या नावाचं?
गोविंद बर्गे यांना मिळालेल्या धमक्या कितपत खरी?
या सर्व मुद्द्यांवर आता तपास अधिक वेग घेत आहे. दरम्यान, पूजाच्या व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त करणाऱ्या कमेंट्सचा अक्षरशः पूर सोशल मीडियावर दिसत आहे.
View this post on Instagram