
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मंचर :
सोने आणि चांदीच्या बाजारपेठेत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होत असलेली दरवाढ आता इतिहासातील उच्चांकावर पोहोचली आहे. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला असून, सुवर्णपेठेतील उलाढाल मंदावली आहे.
दरवाढीचे आकडे चकित करणारे
सोनं (24 कॅरेट) : सध्या प्रती ग्रॅम 10 हजार 697 रुपये.
प्रती 10 ग्रॅम तब्बल 1 लाख 12 हजार रुपये.
चांदी : प्रती किलो 1 लाख 28 हजार 500 रुपये, तर काही बाजारपेठेत 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत भाव.
सहा महिन्यांपूर्वी सोन्याचा भाव 9,800 ते 10,000 रुपये प्रति ग्रॅम दरम्यान होता. त्यामानाने आज जवळपास ७ ते ८ टक्क्यांची झपाट्याने वाढ झाली आहे. चांदीच्या बाबतीत तर तब्बल 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विवाह व सणावारात ग्राहक मागे
विवाहसोहळे, मुहूर्त अथवा सण-उत्सव काळात सोने-चांदी खरेदी करणे ही परंपरा आहे. मात्र आजचे भाव पाहता अनेक ग्राहक सोनं-चांदी घेण्यापासून दूर पळत आहेत.
ज्वेलर्स असोसिएशननुसार, “दरवाढीमुळे ग्राहकांचा उत्साह कमी झाला आहे. पूर्वी ५० ग्रॅम दागिने घेणारा ग्राहक आता फक्त २० ग्रॅमवर समाधानी होतो. चांदीबाबतीत तर छोटेसे वस्त्रसुद्धा लोक टाळतात,” अशी स्थिती आहे.
दरवाढीमागील कारणे
तज्ज्ञांच्या मते सोने-चांदीच्या दरवाढीमागे अनेक घटक कारणीभूत आहेत :
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे सतत होत असलेले अवमूल्यन
जागतिक आर्थिक व राजकीय अस्थिरता
औद्योगिक क्षेत्रातून वाढती चांदीची मागणी
केंद्रीय बँकांकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेली सोन्याची खरेदी
सुवर्णपेठेवर मरगळ
दरवाढीमुळे सुवर्णपेठा अक्षरशः ठप्प झाल्या आहेत. ज्वेलरी शोरूममध्ये पूर्वीप्रमाणे गर्दी दिसत नाही. विक्री कमी झाल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
ग्राहकांची हतबलता
स्थानिक ग्राहकांचे म्हणणे आहे की,
“घरातील लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदी करणे भाग आहे, पण सध्याचे भाव पाहता हात आखडता घ्यावा लागत आहे. आवश्यक तितकेच सोने घेता येते, बाकी इच्छा असूनही मागे हटावे लागते.”