
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई :
देशाचे नवीन उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्रातील महत्त्वाचे राजकीय नेते उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार या सोहळ्यात गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, “अजितदादांच्यावतीने प्रफुल पटेल उपस्थित होते. अजित पवार रायगडमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने शपथविधीला येऊ शकले नाहीत.”
शपथविधी सोहळ्यानंतर बोलताना शिंदे म्हणाले की, “आजचा दिवस एनडीएच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि अभिमानाचा आहे. सी.पी. राधाकृष्णन यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला असून त्यांच्या शपथविधीचा दिमाखदार सोहळा झाला. साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि मनमिळावू स्वभाव असलेले राधाकृष्णन हे या पदाच्या शान-मानात निश्चितच भर घालतील. राज्यपाल आणि संसदीय कार्याचा त्यांना भरपूर अनुभव आहे. देशाच्या विकासात आणि प्रगतीत त्यांचा मोलाचा सहभाग असेल, याची खात्री आहे.”
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयावर शिंदेंनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, “महायुती सरकार जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हाही सर्व निर्णय कायद्याच्या चौकटीत बसवून घेतले. ओबीसी किंवा कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर देखील कायद्याच्या चौकटीत बसवून काढला आहे.”
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी “महाराष्ट्रात नेपाळसारखी स्थिती निर्माण होईल, हिंसाचार होईल” असे वक्तव्य केले. त्यावर शिंदे भडकले. ते म्हणाले की, “अशी वक्तव्ये दुर्दैवी आणि दुर्भाग्यपूर्ण आहेत. देशाचा अभिमान, स्वाभिमान असलेल्या व्यक्ती असे शब्द कधी उच्चारू शकत नाहीत. काही जण अराजकता निर्माण करण्याचा डाव आखत आहेत का, हा प्रश्न पडतो. लोकशाही मजबूत आहे आणि अराजकता पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
दरम्यान, कर्नाटकात काँग्रेस सरकारने मेट्रो स्टेशनवरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव बदलून सेंट मेरी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यावर शिंदे म्हणाले की, “हे अत्यंत दुर्दैवी आहे. इंग्रज गेलेत त्याला 75 वर्षे झाली, त्यांची आठवण ठेवण्याची आवश्यकता नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत. अन्यथा शिवभक्त जशास तसं उत्तर देतील.”