
माणदेश एक्सप्रेस न्यूज | तासगाव :
तासगाव तालुक्यातील सावळज गावात जमिनीच्या वादातून दोन गटांत मोठी मारामारी झाली. या हाणामारीत चौघे जखमी झाले असून पोलिसांत दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसात दिलेल्या फिर्यादीत शशिकांत मलगोंडा पाटील यांनी म्हटले आहे की, ते मंगळवारी सकाळी सुमारास ११ वाजता मुलगा वेदांत पाटील व नातेवाईक सूर्यकांत पाटील यांच्यासह शेतात काम करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते. यावेळी शंकर देवगोंडा पाटील, विजय शंकर पाटील आणि कृष्णा शंकर पाटील यांनी “आमच्या शेतात यायचे नाही,” असे म्हणत त्यांना अडवले. त्यानंतर लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर प्रहार करण्यात आला.
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या वेदांत पाटील आणि सूर्यकांत पाटील यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर “पुन्हा आला तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोपही शशिकांत पाटील यांनी केला आहे. या घटनेत शशिकांत पाटील, वेदांत पाटील आणि सूर्यकांत पाटील तिघे जखमी झाले आहेत.
दरम्यान, दुसऱ्या बाजूने शंकर देवगोंडा पाटील यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत वेगळीच कहाणी सांगितली आहे. ते म्हणतात की, ते स्वतःच्या शेतात घाण काढण्यास गेले असता शेजारी राहणारे शशिकांत पाटील, वेदांत पाटील आणि सूर्यकांत पाटील यांनी “आमच्या शेतात येऊ नका, हे आमच्या वडिलांच्या नावावर आहे,” असे म्हणत त्यांच्याशी वाद घातला.
या वादानंतर तिघांनी मिळून शिवीगाळ केली व दगड मारून त्यांना जखमी केले. यामध्ये शंकर पाटील यांच्या डोक्याला व पाठीवर मार लागल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
या घटनेनंतर तासगाव पोलिसांनी दोन्ही बाजूंकडून गुन्हे दाखल केले आहेत. चौघे जखमी असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. जमिनीच्या मालकीसंदर्भातील वादातून ही गंभीर घटना घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
दरम्यान, सावळज परिसरात पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे. तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


