सांगलीत लाचखोरीचे मोठे प्रकरण : मंडल अधिकारी, कोतवाल अटकेत

0
251

माणदेश एक्सप्रेस न्यूज | सांगली :
कवठेमहांकाळ तालुक्यातील गुंठेवारी जमीन नियमितीकरण करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मंडल अधिकारी आणि कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

मारुती विलास खोत (वय ४८) आणि संजय किसन हारगे (वय ४५, दोघे रा. विठुरायाचीवाडी, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.


तक्रारदाराने आईच्या नावावर गुंठेवारी जमीन खरेदी केली होती. त्यांच्यासह परिसरातील आणखी काही रहिवाशांनी देखील अशा प्रकारे जमीन विकत घेतली होती. या जमिनीचे नियमितीकरण करण्यासाठी पाच जणांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्याचा प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाकडे पाठवण्यासाठी मंडल अधिकाऱ्याने कोतवालामार्फत प्रत्येकी ७ हजार रुपयेप्रमाणे ३५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

तक्रारदारासह इतर अर्जदारांनी चर्चेनंतर अखेर २५ हजार रुपये देण्याचे ठरवले. मात्र या प्रकरणी तक्रारदाराने सरळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली.


तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाच्या सांगली युनिटने पथक तयार करून कवठेमहांकाळ येथे सापळा रचला. त्यानुसार मंडल अधिकारी मारुती खोत याच्यासाठी कोतवाल संजय हारगे लाच स्वीकारत असतानाच त्याला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई ‘लाचलुचपत’चे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोरकुमार खाडे यांच्या पथकाने केली.

या धडक कारवाईमुळे महसूल खात्यातील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आले असून सामान्य नागरिकांच्या त्रासात भर घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात लोकांमध्ये संतोष व्यक्त होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here