
माणदेश एक्सप्रेस न्यूज | नवी दिल्ली :
गुंतवणूक ही आता काळाची गरज बनली आहे. योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने गुंतवणूक केल्यास केवळ सुरक्षितता नव्हे, तर दर महिन्याला निश्चित उत्पन्न देखील मिळू शकते. अशाच प्रकारे नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme – MIS). या योजनेद्वारे गुंतवणूकदारांना दर महिन्याला खात्रीशीर व्याज मिळतं.
काय आहे ही योजना?
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (MIS) ही एक लहान बचत योजना आहे, जी प्रामुख्याने सुरक्षित व निश्चित उत्पन्न शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूकदाराला ठराविक रक्कम एकरकमी जमा करावी लागते आणि त्यावर दर महिन्याला निश्चित व्याज मिळतं.
सध्याचा व्याजदर
या योजनेत पोस्ट ऑफिस ग्राहकांना वार्षिक ७.४ टक्के व्याजदर देत आहे. मिळणारं व्याज थेट गुंतवणूकदाराच्या पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा होतं.
किती गुंतवणूक करता येते?
- किमान गुंतवणूक – ₹१,००० 
- जास्तीत जास्त मर्यादा – - एकट्या खात्यासाठी ₹९ लाख 
- संयुक्त खात्यासाठी ₹१५ लाख (जास्तीत जास्त ३ जण मिळून खाते उघडू शकतात) 
 
उदाहरण समजून घ्या
जर एखाद्या गुंतवणूकदाराने ₹९ लाखांची गुंतवणूक केली तर त्याला दर महिन्याला साधारण ₹५,५५० निश्चित व्याज मिळेल. ही रक्कम थेट सेव्हिंग खात्यात जमा केली जाते.
कालावधी व मॅच्युरिटी
ही योजना ५ वर्षांच्या कालावधीसाठी असते. मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदाराला मूळ रक्कम परत मिळते. इच्छुक गुंतवणूकदार पुन्हा हाच पैसा या किंवा अन्य पोस्ट ऑफिस योजनांमध्ये टाकू शकतात.
खाते उघडण्यासाठी अटी
- गुंतवणूकदाराकडे पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट असणे आवश्यक 
- भारतीय नागरिक असणे बंधनकारक 
- खाते एकट्याच्या किंवा संयुक्त स्वरूपात उघडता येते 
का आहे योजना फायदेशीर?
- दर महिन्याला निश्चित व हमीशीर उत्पन्न मिळतं 
- गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित कारण योजना सरकारमान्य आहे 
- वरिष्ठ नागरिक, निवृत्त कर्मचारी किंवा दरमहा स्थिर उत्पन्न हवं असलेल्या कुटुंबांसाठी उत्तम पर्याय 
 


