
माणदेश एक्सप्रेस न्यूज | कोल्हापूर :
“नियतीच्या मनात काय दडलं आहे, हे कुणीच सांगू शकत नाही.” असं म्हणतात. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील तारदाळ गावाने हे अगदी जवळून अनुभवलं. २०२२ साली गावातील सुपुत्र जवान निलेश खोत देशसेवेत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शहीद झाले आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पतीच्या निधनाने संसार उजाडला, भविष्य धूसर झालं. मात्र या कठीण प्रसंगातून खचून न जाता निलेश यांच्या वीरपत्नी प्रियांका खोत यांनी दाखवलेली जिद्द आज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
निलेश खोत यांच्या निधनानंतर प्रियांका यांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संघर्ष केला. दुःखाचा डोंगर कोसळूनही त्या तुटून पडल्या नाहीत. उलट त्यांनी आपल्या पतीचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला. सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची, ही प्रबळ इच्छा त्यांनी मनाशी पक्की केली. त्यांच्या या निर्णयाला कुटुंबीयांनीही अखंड पाठिंबा दिला.
प्रियंकाने ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नई येथे कठोर प्रशिक्षण पूर्ण केलं. प्रशिक्षण काळात अनेक आव्हाने समोर आली, परंतु ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी एक एक पायरी पार केली. अलीकडेच झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये प्रियांकाने सहभाग घेतला आणि भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर त्यांची अधिकृत नियुक्ती झाली.
प्रियांका यांच्या या गगनभरारीमुळे केवळ खोत कुटुंबाचं नाही, तर संपूर्ण तारदाळ गावाचं मस्तक अभिमानाने उंचावलं. गावात परतल्यावर त्यांचं वाजतगाजत स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जयघोषात प्रियांकाची मिरवणूक काढण्यात आली. गावकरी भारावून गेले होते. शहीद निलेश यांच्या स्मृती डोळ्यांत दाटल्या होत्या, तर प्रियांकाच्या धाडसाने अभिमानाने डोळे पाणावले होते.
प्रियंका खोत यांनी पतीच्या निधनानंतर समाजात उभा केलेला संघर्ष आणि सैन्य दलात अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास हे महिलांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. अशा परिस्थितीत हार न मानता आयुष्याला नवं वळण देणं ही दुर्मीळ बाब आहे. प्रियांका यांच्या या यशाचं कौतुक केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातून होत आहे.
लेफ्टनंट पदावर निवड होऊन प्रियंका यांनी जिल्ह्याचं नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केलं आहे. शहीद जवानाच्या पत्नीने दाखवलेली चिकाटी, पराक्रम आणि धैर्य हे समाजासाठी प्रेरणादायी असून, हे यश महाराष्ट्रासाठीही अभिमानास्पद ठरलं आहे.