
माणदेश एक्सप्रेस न्यूज | कोल्हापूर :
किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला करत आयटीआय कॉलेजजवळील हनुमाननगर भागात राहणाऱ्या ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ४) सकाळी उघडकीस आली. मोहन नारायण पोवार (वय ७०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांचा जीवलग मित्र चंद्रकांत केदारी शेळके (वय ७३, रा. मोहिते मळा, देवकर पाणंद, कोल्हापूर) याने चाकूने गळा चिरून हा खून केला. पोलिसांनी केवळ चार तासांत हल्लेखोरास गजाआड केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन पोवार हे पत्नीच्या निधनानंतर मुलगा पुष्कराज (३१) याच्यासह पाचगाव रोडवरील घरात राहत होते. मुलगा महाविद्यालयात नोकरीसाठी बाहेर गेला होता. सकाळी रिक्षा चालवून घरी परतलेल्या पोवार यांच्या घरातून साडेअकराच्या सुमारास धुराचे लोट निघू लागले. शेजाऱ्यांनी धाव घेऊन स्वयंपाकघरातील आग विझवली असता बेडरूममध्ये पोवार यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आणि त्याजवळ चाकू पडलेला दिसला. गळ्यावर खोल जखम होती. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे, करवीरचे निरीक्षक किशोर शिंदे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर आणि उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी तपास सुरू केला.
सुरुवातीला आत्महत्या की खून याबाबत संभ्रम होता. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास पोवार यांच्या घराकडे जाणारी एक व्यक्ती आढळून आली. त्यावरून पोलिसांनी संशयिताचा शोध घेत अवघ्या चार तासांत चंद्रकांत शेळके याला त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
मोहन पोवार आणि चंद्रकांत शेळके हे एकाच कॉलेजमध्ये शिकलेले आणि अनेक वर्षांचे जिवलग मित्र होते. गुरुवारी सकाळी पोवार यांनी चहा करून दिल्यानंतर जुन्या विषयावरून दोघांत वादाला सुरुवात झाली. वाद वाढला असता पोवार यांनी आईवरून शिवी दिली. याचा राग आल्याने चंद्रकांत शेळके संतापले आणि जवळच पडलेल्या चाकूने पोवार यांचा गळा चिरून टाकला. त्यानंतर तेथून पलायन केले. पोलिसांच्या माहितीनुसार, शेळके विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले आहेत.
घटनेनंतर थोड्याच वेळात घरातून धुराचे लोट निघू लागले. प्राथमिक अंदाजानुसार, झटापटीत देव्हाऱ्यावरील समई पडल्यामुळे आग लागली असावी किंवा हल्लेखोराच्या हातात विद्युत वायर अडकल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागली असावी. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर आगीचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
जुना राजवाडा पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संयुक्त तपास सुरू केला आहे. संशयिताविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.