
माणदेश एक्सप्रेस न्यूज | बीड :
बीड जिल्ह्यात खुनांच्या मालिका सुरूच असून, पाटोदा तालुक्यातील रायमोहा पोलिस चौकी हद्दीतील दगडवाडी येथे शुक्रवारी (दि. ५ सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास एका मेंढपाळ तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील वाढत्या खुनांच्या मालिकेत ही आणखी एक भर पडली आहे.
मृत तरुणाची ओळख दीपक केरा भिल्ल (वय १९, रा. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) अशी झाली आहे. दीपक आपल्या कुटुंबीयांसह मेंढ्या चारण्यासाठी पाटोदा तालुक्यातील दगडवाडी परिसरात वास्तव्यास आला होता. गुराखी म्हणून काम करणारा हा तरुण पहाटेच्या वेळी अचानक झालेल्या हल्ल्यात ठार मारण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास एकनाथ भोसले (वय ५२, रा. वैजापूर, जि. संभाजीनगर) या आरोपीने दीपकच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. गुन्हा करून आरोपी फरार झाला असून, घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच रायमोहा पोलिस चौकी तसेच पाटोदा पोलिस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक संभाजी तागड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत बीड जिल्ह्यात खुनांच्या घटना वाढल्या असून, सलग घडणाऱ्या या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटोदा तालुक्यातील ही घटना त्या मालिकेत अधिक चिंतेची भर घालत आहे.