‘कास पठारावर फुलोत्सवाला आजपासून सुरुवात’ ; निसर्गाच्या रंगछटा अनुभवण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता

0
121

माणदेश एक्सप्रेस न्यूज | बामणोली :
जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवलेले कास पठार पुन्हा एकदा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. पावसाने उसंत घेतल्याने पठारावर फुलांचा हंगाम आजपासून सुरू झाला असून, पठारावर निसर्गाने आपल्या रंगांची उधळण केली आहे. दरवर्षीप्रमाणेच या फुलोत्सवाला पर्यटकांची मोठी गर्दी होणार असल्याचे संकेत आहेत.

पठारावर सध्या तेरडा, चवर, गेंद, सीतेची असावे, नीलिमा, आभाळी, भारंगी यांसह तुरळक प्रमाणात टोपली कारवी फुलांचा बहर दिसत आहे. याशिवाय पठारावरील प्रसिद्ध कुमुदिनी तलावही फुलांनी सजून गेला आहे. लहान-लहान जातींची फुले उमलायला सुरुवात झाल्याने पुढील काही दिवसांत पठारावर रंगांची आणखी उधळण होणार आहे. पांढरा, पिवळा, निळा आणि गुलाबी रंगछटा अनुभवण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता ताणली गेली आहे.


या हंगामासाठी सातारा वन विभाग आणि कास पठार कार्यकारी समिती यांनी संयुक्त नियोजन केले आहे.

  • प्रति व्यक्ती १५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

  • या शुल्कात बस तिकीट व पार्किंग शुल्क समाविष्ट आहे.

  • १२ वर्षाखालील मुलांना प्रवेश मोफत असेल.

  • १२ वर्षांवरील शालेय विद्यार्थ्यांसाठी शुल्कात सवलत दिली जाणार आहे.


यंदा प्रथमच एकेरी वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.

  • कास पठारावरून परतताना वाहनांना घाटाई देवी मंदिर मार्गे सातारा किंवा अंधारी-कोळघर-कुसुंबी-मेढा मार्गे महाबळेश्वर, पुणे, मुंबईकडे वळवले जाणार आहे.

  • ही एकेरी वाहतूक शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी लागू असेल.
    या निर्णयामुळे गर्दीचे नियोजन सुरळीत होणार असल्याचे समितीचे म्हणणे आहे.


दरवर्षी देश-विदेशातून हजारो पर्यटक कास पठारावरील फुलोत्सव अनुभवण्यासाठी दाखल होतात. फुलांचा अल्पकाळ टिकणारा हंगाम पाहण्यासाठी पुढील महिनाभराची वेळ सर्वोत्तम मानली जाते. वन विभागाने पर्यटकांना नियमांचे पालन करूनच पठाराचा आनंद घ्यावा, तसेच निसर्ग संवर्धनाला बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here