
माणदेश एक्सप्रेस न्यूज
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाबाहेर रविवारी सकाळपासून मराठा समाजाच्या हजारो बांधवांची प्रचंड गर्दी झाली. या गर्दीने घोषणाबाजी, ढोल-ताशे, हलगीच्या तालावरचा ठेका आणि पारंपरिक खेळांचा उत्सव अशा मिश्र स्वरूपाने परिसर दणाणून टाकला.
मराठा आंदोलकांनी गळ्यात भगवे रुमाल, डोक्यावर भगव्या टोप्या घालून “एक मराठा, लाख मराठा” अशा घोषणा देत सीएसएमटी परिसर गाजवला. आझाद मैदानाच्या दिशेने निघालेल्या मोर्चेकऱ्यांमुळे संपूर्ण मार्ग भगव्या रंगात रंगून गेला.
यावेळी आंदोलकांनी केवळ घोषणाबाजीवर भर न देता पारंपरिक खेळांचा आनंद घेत आंदोलनात वेगळेपण आणले. विट्टीदांडू, खो-खो, लंगडी यासारखे खेळ तरुणांनी खेळल्यामुळे आंदोलनात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी महिलांनी पारंपरिक फुगड्याही खेळल्या. यामुळे आंदोलन केवळ निषेधापुरते मर्यादित न राहता सामाजिक ऐक्य, संस्कृती आणि उत्साहाचे दर्शन घडवत असल्याचे चित्र दिसले.
हलगी-ताशांच्या गजरात अनेक तरुणांनी नृत्य करत परिसर गाजवला. सन सुरईच्या सुरांनी वातावरण भारावून गेले. काही जणांनी तर ताशांच्या तालावर पारंपरिक नृत्य सादर केले. घोषणाबाजी, संगीत आणि खेळांचा मेळ साधला गेला होता.
मोर्चेकऱ्यांच्या मोठ्या लोंढ्यामुळे सीएसएमटी परिसरात वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला. पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त ठेवत परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. आंदोलकांचा उत्साह लक्षात घेता, पोलिसांनी संयम राखत व्यवस्थापन केले.
आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सीएसएमटी परिसरात जमलेले हे आंदोलनकारक आपली मागणी ठाम असल्याचा संदेश देताना दिसले. खेळ, संस्कृती आणि घोषणाबाजी यांच्या संगमातून आंदोलकांनी “आरक्षण हा आमचा हक्क आहे, तो मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही” असा स्पष्ट इशारा दिला.


