
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला मोर्चा अखेर मुंबईत दाखल झाला असून, आझाद मैदान परिसरात आंदोलनाचं प्रचंड वादळ उसळलं आहे. लाखोंच्या संख्येनं आंदोलक आझाद मैदान परिसरात दाखल झाल्याने केवळ परिसरातच नव्हे, तर संपूर्ण मुंबईत वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला.
२७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मोर्चाला सुरुवात झाली. या प्रवासात पहिला मुक्काम ऐतिहासिक किल्ले शिवनेरी येथे झाला. शिवजन्मभूमीचं दर्शन घेऊन मराठा समाजानं आपला निर्धार अधिक दृढ केला. गुरुवारी सकाळी शिवनेरीच्या मातीत कपाळ टेकवून जरांगे पाटलांनी आंदोलनाचा प्रवास पुढे नेला. मंचर, राजगुरुनगर, तळेगाव, लोणावळा मार्गे ताफा नवी मुंबईत दाखल झाला आणि अखेर आज पहाटे मुंबई गाठली.
या मोर्चात सहभागी झालेल्या गाड्यांचा ताफा तब्बल साडेसहा हजारांवर गेला. पहाटे मुंबईत प्रवेश करताच मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर भीषण ट्रॅफिक जॅम झाला. पोलिसांनी व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांच्या प्रचंड गर्दीमुळे संपूर्ण महामार्ग ठप्प झाला.
सकाळी साडेनऊच्या सुमारास मनोज जरांगे पाटलांची कार थेट आझाद मैदानात पोहोचली. तिथे पोहोचताच त्यांनी मंचावर भाषण करताना स्पष्ट शब्दांत सांगितलं की,
“गुलाल माथ्यावर लागल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही.”
त्याचबरोबर आंदोलकांना पोलिसांना सहकार्य करण्याचं आणि शिस्तबद्ध राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
सरकारनं या आंदोलनाला केवळ एका दिवसाची मुदत आणि ५ हजार उपस्थितांची मर्यादा घातली होती. मात्र प्रत्यक्षात लाखोंच्या संख्येनं आंदोलक मुंबईत दाखल झाले. त्यामुळे पाणी, शौचालय आणि अंघोळीच्या सुविधा अपुऱ्या पडल्या.
याच गैरसोयीमुळे अनेक आंदोलकांना रस्त्यावरच अंघोळ करावी लागली. काहींनी मैदानात असलेल्या कृत्रिम डबक्यात उतरून आंघोळ केली, तर काहींनी थेट टँकरमधील पाण्याने रस्त्यावरच अंघोळ केली. एका आंदोलकाने टॉवेल बांधून उघड्यावर अंघोळ करताना दिसल्याचं दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं.
तसेच, रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्याने हे रिकामे रस्ते आंदोलकांसाठी विसाव्याचं ठिकाण ठरले. काहींनी तिथेच भोजन उरकलं, तर काहींनी सरळ रस्त्यावरच झोप काढली.
या आंदोलनातील अनोख्या दृश्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. आझाद मैदान परिसरात अजूनही प्रचंड गर्दी असून, मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झालेला आहे.
मोर्चातील गर्दी आणि गैरसोयी लक्षात घेऊन जरांगे यांनी आंदोलकांना शिस्त पाळण्याचं आवाहन करत, गाड्या योग्य ठिकाणी पार्क करण्यास सांगितलं. तसेच मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून दुपारपर्यंत परतण्याचा सल्लाही दिला.
मुंबईत दाखल झालेल्या मराठा आंदोलकांच्या या प्रचंड मोर्चामुळे शहरात वाहतूक ठप्प झाली, प्रशासनाच्या सर्व अंदाजांचा फज्जा उडाला, तर आंदोलकांच्या हालअपेष्टा देखील उघडकीस आल्या. मात्र, या सगळ्या गोंधळातही आंदोलकांचा निर्धार कायम असून, आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.