
माणदेश एक्सप्रेस न्यूज | सातारा :
गणेशोत्सवासारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात पुन्हा एकदा कोयता गँग सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. ऐन सकाळच्या मॉर्निंग वॉकवेळी महिलांच्या गळ्यावर कोयता ठेवून मंगळसूत्र हिसकावल्याच्या धक्कादायक घटना घडत असून, गेल्या आठवडाभरात तीन अशा लुटमारीच्या प्रकरणांनी नागरिकांना अक्षरश: धडकी भरवली आहे. गुरुवारी सकाळी प्रतापसिंह नगर येथील मेडिकल कॉलेजसमोर घडलेला प्रकार तर सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.
गुरुवारी सकाळी सोनाली दीपक लोंढे (वय २६, रा. कृष्णानगर, सातारा) आपल्या दोन महिला मैत्रिणीसह मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. त्यावेळी तोंडाला काळे रुमाल बांधलेले तिघे युवक दुचाकीवरून आले. मागे बसलेला एकजण दुचाकीवरून उडी मारून थेट महिलांच्या दिशेने धाव घेतला. त्याच्या हातात धारदार कोयता पाहून महिला घाबरून किंचाळत पळू लागल्या.
लोंढे पळताना खड्ड्यात पाय अडकल्याने खाली कोसळल्या. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यावर कोयता ठेवला आणि दीड तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. त्यांच्यासोबत असलेल्या दोन महिला जीव वाचवण्यासाठी जवळच्या बंगल्यातील गेटवरून उड्या मारून आत शिरल्या. यामुळे काही क्षण परिसरात एकच गोंधळ उडाला.
या लुटमारीचे दृश्य सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाले असून, त्यातील दृश्य पाहून नागरिक दचकले आहेत. अत्यंत निर्धोकपणे महिलेचा पाठलाग करून कोयता उगारून मंगळसूत्र हिसकावण्याची घटना पाहताक्षणी अंगावर काटा आणणारी ठरत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, महिलांसह पुरुषांनाही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताना असुरक्षिततेची जाणीव होत आहे.
सातारा शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर सातारा पोलिसांची झोप उडाली असून, स्थानिक गुन्हे शाखा, शाहूपुरी, सातारा तालुका आणि वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा तपासात गुंतला आहे. प्रतापसिंह नगर परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात झाली असून, या गँगचा माग काढण्यासाठी गुप्तहेर यंत्रणाही सक्रिय झाली आहे.
गणेशोत्सवात दहशत माजवणाऱ्या या गँगमुळे साताऱ्यातील महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. नियमित मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांनी घराबाहेर पडणे टाळावे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून, कोणताही संशयास्पद प्रकार दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन केले आहे. तसेच, या गुन्हेगारांचा शोध घेऊन लवकरच त्यांना गजाआड केले जाईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.