फडणवीसांवर जरांगेंचा हल्लाबोल: मराठ्यांची थट्टा करू नका

0
93

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मागणीला गती देत समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणास सुरुवात होणार असल्याची घोषणा त्यांनी केली असून यासाठी बुधवारी सकाळी आंतरवली सराटी येथून गणेशपूजन करून त्यांनी प्रस्थान केले. उपोषणाच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आणि “मराठ्यांना फसवलं गेलं आहे” असा आरोप केला.


जरांगे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या वेदना समजून घ्यायला हव्या होत्या. त्यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. आता समाजाला न्याय मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. मराठा समाजाने राज्याच्या घडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे, त्यामुळे आमच्या भावनांचा आदर करणे सरकारचे कर्तव्य आहे.”

ते पुढे म्हणाले की, फडणवीस मुंबईत कोणत्याही आंदोलकाला आझाद मैदानावर जाण्यापासून रोखणार नाहीत आणि गरीब जनतेच्या वेदनांचा आदर करतील, अशी अपेक्षा आहे. पण जर त्यांनी समाजाची थट्टा केली आणि फक्त एका दिवसाचीच परवानगी दिली, तर हे गंभीर आहे. मराठ्यांची लाट वारंवार उठली तर येणारे दिवस फडणवीसांचे राजकीय करिअर बरबाद करणारे ठरतील.”


जरांगे यांनी पुढे मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला देताना म्हटले की, “फडणवीसांकडे मराठ्यांची मनं जिंकण्याची मोठी संधी आहे. त्यांनी संधीचं सोनं करायला हवं. जर त्यांनी मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी केली, तर मराठा समाज कधीही दिलेलं आरक्षण विसरणार नाही. उलट आम्ही दिलेला शब्द कायम ठेवूमराठे मरेपर्यंत उपकार मानतील.”


२९ ऑगस्टपासून सुरू होणारे उपोषण हे मराठा आंदोलनाच्या लढ्याचा नवा टप्पा मानला जात आहे. आधीच राज्यभरातील लाखो मराठा समाज बांधव या प्रश्नावर आक्रमक झाले असून, सरकारने जर तातडीने ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी भडकण्याची शक्यता आहे.


मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला “राजकीय करिअर बरबाद होईल” हा थेट इशारा महाराष्ट्राच्या राजकारणात नवी खळबळ उडवणारा ठरला आहे. आता फडणवीस आणि महायुती सरकार समाजाच्या मागण्यांना कशा पद्धतीने प्रतिसाद देतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here