कौतुकाने रंगली राजकारणात चर्चा, जरांगेंकडून शिंदे-अजितदादांची स्तुती

0
104

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुन्हा एकदा भगवं वादळ मुंबईकडे धडकले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हलकल्लोळ माजवला आहे. मात्र, मुंबईकडे निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे दोन उपमुख्यमंत्री – एकनाथ शिंदे आणि अजित पवार – यांची जाहीर स्तुती करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.


जरांगे पाटील म्हणाले, “एकनाथ शिंदे साहेब हा माणूस खरा आहे. तो साथ देतो. जनतेच्या वेदना समजून घेतो. गोर-गरिबांची व्यथा जाणून घेतो. सत्तेपेक्षा गोरगरिब जनतेच्या दुःखाला महत्त्व देणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे.”
त्यांच्या या विधानाने शिवसेना (शिंदे गट) च्या पोटात गोडी पेरली असली, तरी विरोधकांनी डोळे विस्फारले आहेत.


याचबरोबर अजित पवारांविषयी बोलताना जरांगे म्हणाले, “गरिबांचे प्रश्न जाणून घेतले की अजित पवार ताबडतोब निर्णय घेतात. लोकांचं म्हणणं ऐकतात आणि सोडवतात. त्यांची कार्यशैली तडकाफडकी आहे.”
त्यामुळे जरांगेंनी एकाचवेळी राज्यातील दोन उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक करून राजकीय समीकरण अधिकच गुंतागुंतीचे केले आहे.


मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजित असलेला दरे गावचा दौरा रद्द केल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये जरांगेंच्या आंदोलनाचा दबाव जाणवतो आहे, असेही राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.


दरम्यान, जरांगे पाटील आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातही शब्दयुद्ध रंगले आहे. वाघ यांनी जरांगेंवर टीका केली असता, जरांगे यांनीही पलटवार करत आंदोलनाची धार कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.


मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे व अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली असली तरी, या कौतुकामागे राजकीय संदेश दडलेला आहे का, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण, एका बाजूला मुंबईकडे येणारं आंदोलन आणि दुसऱ्या बाजूला जरांगेंकडून होत असलेलं कौतुक – या दोन्ही घडामोडींनी आगामी राजकीय समीकरणावर मोठा परिणाम होऊ शकतो, असा कयास व्यक्त होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here