
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | जळगाव/चाळीसगाव :
चाळीसगाव शहर पुन्हा एकदा दहशतीच्या छायेत गेले आहे. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर सोमवारी उशिरा रात्री अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. धारदार कोयत्याने वार करून चौधरी यांना गंभीर जखमी करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौधरींच्या अंगावर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास वैष्णवी साडी सेंटरजवळ चौधरी यांना अडवण्यात आलं. काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेनंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली. हल्ल्यानंतर तातडीने चौधरींना उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले.
यापूर्वी फक्त दोन दिवसांपूर्वीच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. त्यामुळे हा हल्ला राजकीय की वैयक्तिक वादातून झाला याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
हल्ल्यानंतर पोलिसांनी शहरात उच्च सतर्कता जाहीर केली असून, वेगवेगळ्या पथकांना हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा हल्ला राजकीय शत्रुत्व की वैयक्तिक वादातून झाला, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
या घटनेचा भाजप जिल्हा संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. “पक्षाचा निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्ता दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ल्याचा बळी ठरतो, हे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे,” अशी प्रतिक्रिया जिल्हा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात माजी नगरसेवकांवर प्राणघातक हल्ला होण्याची ही पहिली घटना नाही. फेब्रुवारी 2024 मध्ये भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर सुद्धा अज्ञातांनी गोळीबार केला होता. हनुमान वाडीतील कार्यालयात बसले असताना चार ते पाच तरुणांनी चेहऱ्यावर रुमाल बांधून मोरे यांच्यावर गोळीबार केला होता. त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले होते.
दोन वर्षांत चाळीसगावात भाजपच्या दोन माजी नगरसेवकांवर प्राणघातक हल्ला झाल्यामुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांकडून वेगवान कारवाईची मागणी नागरिक व भाजप कार्यकर्त्यांकडून होत आहे.
👉 या घटनेमुळे चाळीसगाव आणि जळगाव जिल्हा हादरला असून पुढील तपासात हल्लेखोर आणि हल्ल्याच्या कारणांबद्दल कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.