ठाकरे बंधूंचं कौटुंबिक मिलन की राजकीय डावपेच? गणपती दर्शनानंतर रंगल्या चर्चा

0
82

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ठाकरे बंधू – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे आज (२७ ऑगस्ट) दादर येथील राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी दाखल झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेही उपस्थित होते. दोन्ही कुटुंबीयांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर स्नेहभोजन आयोजित असल्याचीही माहिती समोर आली आहे.


गेल्या काही वर्षांपासून दुरावलेले ठाकरे बंधू मागील काही महिन्यांपासून एकमेकांच्या अधिक जवळ येत असल्याचं चित्र आहे.

  • ५ जुलैला विजय मेळाव्यात दोन्ही भाऊ एकत्र आले होते.

  • त्यानंतर २७ जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. अनेक वर्षांनी ते मातोश्रीवर दाखल झाल्याने मोठी राजकीय चर्चा रंगली होती.

  • आज उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ‘शिवतीर्थ’वर गेले आहेत.


उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वीच राज ठाकरे यांनी फोन करून उद्धव ठाकरे यांना गणेशोत्सवासाठी खास आमंत्रण दिलं होतं. हे आमंत्रण स्वीकारत उद्धव ठाकरे आज कुटुंबासह राज ठाकरेंच्या घरी आले. दर्शनानंतर दोन्ही कुटुंबीयांसाठी खास स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये आगामी राजकीय घडामोडींवर काही चर्चा होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील वाढती जवळीक मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतेच संकेत दिले होते की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढू शकतात. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज–उद्धव ठाकरेंमधील ही भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते आहे.


राज ठाकरे यांचं पूर्वीचं निवासस्थान ‘कृष्णकुंज’ असलं तरी गेल्या तीन वर्षांपासून ते ‘शिवतीर्थ’ या नव्या घरात राहत आहेत. कलासक्त राज ठाकरेंनी या घराचं वास्तुरचनात्मक सौंदर्य विशेष पद्धतीने उभारलं आहे. अनेक राजकीय नेते येथे गेले असले तरी उद्धव ठाकरे मात्र आतापर्यंत कधीही शिवतीर्थवर गेले नव्हते. गणपतीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी या वास्तूवर पहिल्यांदा पाऊल ठेवले.


गेल्या काही वर्षांतील कटुता बाजूला ठेवून ठाकरे बंधूंची वाढती जवळीक हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं समीकरण बदलणारे पाऊल ठरू शकतं.

  • महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर असल्याने या दोन्ही पक्षांचा संभाव्य मेळावा भाजप-शिंदे गटासाठी मोठं आव्हान ठरू शकतो.

  • दोन्ही कुटुंबीयांची उपस्थिती ही केवळ कौटुंबिक जवळीक नाही, तर आगामी राजकीय निर्णयांचीही चुणूक असल्याचे बोलले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here