
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | शिरोळ :
प्रेमसंबंधाच्या प्रकरणातून निर्माण झालेल्या वादाचा थरकाप उडवणारा परिणाम सोमवारी रात्री कनवाड (ता. शिरोळ) येथे दिसून आला. गावातील एका तरुणीने प्रियकरासोबत पळून गेल्याच्या संशयावरून तिच्या नातेवाईकांनी प्रियकराला मदत केली असा आरोप करत संपूर्ण कुटुंबावरच जीवघेणा हल्ला चढवला. दगड, काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी झालेल्या या मारहाणीत फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या कुटुंबातील पाच सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत. शिरोळ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन महिलांसह दहा जणांना अटक केली असून त्यांना जयसिंगपूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्वांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
अक्षय अशोक कोळी (रा. कनवाड) यांनी याबाबत शिरोळ पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, गावातील गणेश बनकर याच्यासोबत एक तरुणी पळून गेली. या मुलीला पळून जाण्यास अक्षयने मदत केली असा संशय मुलीच्या नातेवाईकांना आला. यामुळे सोमवारी रात्री जावेद मुजावर, त्याची पत्नी उमरान, असीम चिलू, सादिक मुजावर, आलम मुजावर, नदीम आवटी, तोहीद मुजावर, साद बुरान, लाजम मुजावर यांची पत्नी (सर्व रा. कनवाड) तसेच सैफअली तराळ (रा. इचलकरंजी) यांच्यासह चार-पाच जणांनी मिळून कोळी कुटुंबाच्या घरावर हल्ला चढवला.
हल्लेखोरांनी घरात घुसून दगडफेक व काठ्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी अक्षय कोळी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर आई सुनीता कोळी, वडील अशोक कोळी, चुलती सीमा कोळी, चुलत भाऊ संदीप कोळी आणि लहान भाऊ ऋषिकेश कोळी यांना जबर मारहाण झाली असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. हल्लेखोरांनी घराचेही मोठे नुकसान केले आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक केली. या प्रकरणी दहा जणांना ताब्यात घेतले असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. सर्वांना मंगळवारी जयसिंगपूर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या या घटनेमुळे कनवाड गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून गावात चोख बंदोबस्त ठेवला आहे. पुढील तपास शिरोळ पोलीस करत आहेत.