गॅस पाईपलाईन स्फोटाने उडाला धसका ; चौघांची प्रकृती चिंताजनक

0
134

माणदेश एक्सप्रेस न्यूज | कोल्हापूर :
कळंबा कारागृहाच्या मागील भागातील मनोरंभ कॉलनीत सोमवारी रात्री गॅस पाईपलाईनचा प्रचंड स्फोट झाला. या घटनेत दोन चिमुकल्यांसह त्यांची आई आणि आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. घटनेमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली असून आगीत घराचे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.

जखमींमध्ये शीतल अमर भोजणे (२९), प्रज्वल अमर भोजणे (५), इशिका अमर भोजणे (३) आणि अनंत भोजणे (६०) यांचा समावेश आहे. त्यातील शीतल यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


मनोरंभ कॉलनीत सोमवारी सकाळीच नवीन गॅस पाईपलाईनची जोडणी करण्यात आली होती. योगायोगाने पहिली जोडणी भोजणे कुटुंबाकडे करण्यात आली होती. मात्र, रात्रीच या पाईपलाईनमधून गॅस लीक होऊन भीषण स्फोट झाला.

रात्री दहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास शीतल भोजणे स्वयंपाकघरात असताना त्यांच्या दोन मुलांसह अनंत भोजणे हॉलमध्ये बसले होते. तेवढ्यात गॅस गळती होऊन काही क्षणांतच प्रचंड स्फोट झाला. स्फोट इतका जबरदस्त होता की, घराच्या खिडकीच्या काचा फुटून समोरच्या घरात जाऊन आदळल्या.

गॅसच्या ज्वाळांनी शीतल भोजणे गंभीर भाजल्या तर, हॉलमध्ये बसलेले दोन्ही मुले व आजोबाही भाजले गेले. शीतल यांचा अंगावर पेट घेतल्याने त्या बाहेर पळाल्या. तेव्हा स्थानिक नागरिकांनी धाव घेत त्यांच्या अंगावर चादरी टाकून आग आटोक्यात आणली.


स्फोटानंतर नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. दरम्यान, शेजारच्यांनी धाडस करून गॅस पाईपलाईनचे बटन बंद केल्याने आग आणखी पसरली नाही. काही क्षणांत अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग नियंत्रणात आल्यानंतर नुकसानीचे चित्र समोर आले.

या दुर्घटनेत संपूर्ण घर जळून खाक झाले असून घरगुती साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अंदाजे दहा लाखांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.


जखमींच्या उपचारासाठी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शीतल यांचे पती अमर भोजणे हे व्यवसायाने कूक असून, रोजंदारीवर काम करून कुटुंब चालवतात. अशा स्थितीत या घटनेमुळे कुटुंबावर प्रचंड संकट ओढावले आहे.


नवीनच जोडण्यात आलेली गॅस पाईपलाईन आणि त्याच दिवशी झालेला स्फोट यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पाईपलाईन जोडणी करताना सुरक्षा उपाययोजना का घेण्यात आल्या नाहीत, या प्रश्नांवर आता चर्चा रंगली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here