
माणदेश एक्सप्रेस न्यूज | बीड :
बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरात काल झालेल्या राड्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. गेवराईतील आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आणि हाकेंच्या समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर आज लक्ष्मण हाकेंनी थेट आमदार पंडित आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली.
“जरांगे हे साडेअठ्ठावीस किलोचं भूत”
हाकेंनी जरांगेंवर घणाघाती हल्ला करताना म्हटलं,
“गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राच्या मानगुटीवर हे साडेअठ्ठावीस किलोचं भूत बसलं आहे. गावोगावी घरं जळत आहेत, हल्ले होत आहेत, सामान्य माणूस वेठीस धरला जातोय… पण तरीही पोलिसांनी, गृहविभागाने त्याला कधीच अटक केलेली नाही.”
त्यांनी सवाल केला की, कायदा पाळणाऱ्यांवर पोलिस एवढ्या तत्परतेने गुन्हे दाखल करतात, पण जरांगेंविरोधात का नाही? “पाच मिनिटांत नोटीस देऊन आमच्यावर गुन्हा दाखल केला जातो, मग जरांगेंवर कारवाई का नाही?” असा संतप्त प्रश्न हाकेंनी पोलिसांना विचारला.
“आम्ही तुरुंगात जायला तयार, पण न्याय समान हवा”
हाके म्हणाले, “आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत. पण कायदा जरांगेसाठी वेगळा आणि ओबीसींसाठी वेगळा का? सरकार उलथवायला जरांगेंकडे किती आमदार आहेत? त्यांच्यामागे कोणाचा हात आहे?”
“हलगी नाही, आमच्याकडे नगारा आहे!”
मनोज जरांगे पाटील यांच्या “सरकार उलथवू” या वक्तव्यावर हाकेंनी टोला लगावत म्हटलं,
“कुठं तुझी हलगी वाजवतोय रे? आमच्याकडे नगारा आहे नगारा! आणि हा नगारा ज्या दिवशी वाजेल, त्या दिवशी आसमंत उजळून निघेल. आम्हाला खूप छळायचा प्रयत्न करू नका.”
त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, ओबीसी समाज आता रस्त्यावर उतरला तर परिस्थिती वेगळी असेल.
आमदार पंडितांवर वाळू माफियांचे आरोप
लक्ष्मण हाकेंनी केवळ जरांगेंवरच नाही, तर स्थानिक आमदार विजयसिंह पंडित यांच्यावरही गंभीर आरोप केले.
त्यांनी सांगितलं, “पंडित यांनी गोदापात्राची चाळण केली आहे. त्यांचे कार्यकर्ते आणि वाळू माफिया सर्रास वाळू चोरी करत आहेत. ते स्वतः वाळूसम्राट आहेत. जर त्यांना जरांगेंची एवढी कड असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन आंदोलनात सहभागी व्हावं.”
“ओबीसी कधी रस्त्यावर उतरणार?”
शेवटी हाकेंनी ओबीसी समाजालाही आवाहन करत प्रश्न केला की,
“आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून ओबीसी कधी रस्त्यावर उतरणार? आता वेळ आली आहे की, आपणही संघर्षाची भाषा करावी.”
दरम्यान, पोलिसांनी स्वतःहून कारवाई करत हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये बीडमधील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.