
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई :
नेहमीच गर्दीने फुलून राहणाऱ्या मरीन ड्राईव्ह परिसरात सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नरिमन पॉइंटजवळ समुद्रात एका तरुणीचा मृतदेह तरंगताना दिसून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाने मुंबईत खळबळ उडाली आहे.
मृत तरुणीची ओळख मनिता गुप्ता अशी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव मनिता गुप्ता (वय २४ वर्षे) असून ती गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. रविवारी (२४ ऑगस्ट) पासून ती अचानक गायब झाली होती. या बेपत्ता होण्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी कफ परेड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. शोधमोहीम सुरू असतानाच सोमवारी सकाळी नरिमन पॉइंट समुद्रकिनाऱ्यावर तिचा मृतदेह आढळला.
चेहऱ्यावर जखमा, मृत्यूचं गूढ गडद
पोलिसांनी सांगितले की, मनिता गुप्ता हिने काळा टी-शर्ट परिधान केलेला होता. तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा दिसून आल्या आहेत. त्यामुळे हा मृत्यू साधा अपघाती किंवा आत्महत्येचा नसून, घातपाताचा संशय अधिक गडद होत आहे. तरीही शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
समुद्रकिनारी मोठी खळबळ
नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांना समुद्रात मृतदेह दिसून आला. लगेच पोलिसांना कळवण्यात आलं. काही वेळातच कफ परेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी खळबळ उडाली.
आत्महत्या की हत्या?
या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मनिता गुप्ता हिने स्वतःहून समुद्रात उडी मारली का?
की तिच्यासोबत कुणी घातपात करून मृतदेह समुद्रात टाकला?
तिच्या चेहऱ्यावर आढळलेल्या जखमा नेमक्या कशा झाल्या?
या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पोलिसांनी तपासाची सूत्रं हाती घेतली आहेत.
पोलिसांची पुढील कारवाई
कफ परेड पोलिस ठाण्याचे अधिकारी यांनी सांगितले की, “मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत चेहऱ्यावर जखमा असल्याचे दिसून आले आहे. मृत्यू आत्महत्येचा आहे की घातपाताचा, हे तपासाअंती स्पष्ट होईल.”
कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मनिता गुप्ता दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने तिचे कुटुंबीय आधीच चिंतेत होते. मात्र सोमवारी तिचा मृतदेह मिळाल्याने घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.