
माणदेश एक्सप्रेस न्यूज | सांगली :
“मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो, मग तुम्हाला अडचण काय आहे?” असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच केले होते. या विधानाचा तीव्र समाचार घेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी रविवारी (दि. 24) सांगलीत जोरदार प्रतिउत्तर दिले. बाळासाहेब गलगले फाऊंडेशनतर्फे त्यांना प्रदान करण्यात आलेल्या ‘धर्मरक्षक’ पुरस्कार सोहळ्यात त्यांनी या विषयावर भाष्य केले.
पडळकर म्हणाले,
“आमच्या वारकरी संप्रदायातील पांडुरंगाला मांसाहार मान्य नाही. जर कोणी म्हणत असेल की माझ्या पांडुरंगाला मटण चालते, तर मग तो पांडुरंग नव्हे तर वेगळाच देव असावा. ज्या देवाला मटण चालते, असा देव असेल, तर तो मशिदीत असावा. तो त्यांचा देव असू शकतो, पण आमच्या वारकर्यांचा पांडुरंग हा शाकाहारी परंपरेत आहे.”
ते पुढे म्हणाले,
“आज मताच्या राजकारणासाठी वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावणारी विधाने केली जात आहेत. वारकर्यांच्या मनाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. राजकारणासाठी कोणी किती खाली जाईल, याला नेम उरलेला नाही. अशा विधानांचा आम्ही निषेध करतो.”
या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यात पडळकर यांच्या वक्तव्यामुळे वातावरण भारावले आणि उपस्थित वारकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या.