
माणदेश एक्सप्रेस न्यूज | सोशल मीडिया :
पाळीव प्राण्यांवरील प्रेमाला कधी कधी अविश्वसनीय असे स्वरूप लाभते. कोणी आपल्या श्वानाचा वाढदिवस साजरा करतो, कोणी पोपटाला दागिने घालतो, तर कोणी मास्यांना सजावटीच्या टाकीत ठेवून पार्टी करतो. पण आता तर एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका कुटुंबाने आपल्या लाडक्या ‘चेरी’ नावाच्या मांजरीचे चक्क डोहाळजेवण ठेवले असून, हा कार्यक्रम पाहून नेटकरी थक्कही झाले आहेत आणि पोट धरून हसतही आहेत.
मांजरीचा ‘डोहाळे सोहळा’
“कुणीतरी येणार येणार गं, चेरीचे डोहाळजेवण” असा संदेश देणारे कागदाचे पोस्टर, फुलांची सजावट, आणि खास डेकोरेशन करून चेरीसाठी बेबी शॉवरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
चेरी मांजरीला गुलाबी रंगाचा पोशाख घालण्यात आला. तिच्या कपाळावर चंद्रकोर टिकली, गळ्यात ठुशी, तर अंगावर पारंपरिक कापड घालून तिला गर्भवती स्त्रीप्रमाणे सजवण्यात आले. एवढेच नव्हे, तर तिच्या जोडीदार बोक्याच्या डोक्यावर टोपी ठेवून त्यालाही या समारंभात सहभागी करण्यात आले.
डोहाळजेवणातील पारंपरिक पद्धतीप्रमाणे “मुलगा, मुलगी की दोन्ही” असे तीन पर्यायाच्या वाट्या ठेवण्यात आल्या होत्या. या दृश्यांनी नेटकऱ्यांचे मनोरंजन तर झालेच पण, प्राण्यांना कुटुंबाचा एक भाग समजून त्यांना अशा रितीने मान मिळतोय हे पाहून अनेकांनी कौतुकही केले.
नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर होताच चांगलाच व्हायरल झाला. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले, तर काहींनी मजेशीर टोमणे मारले.
“पैशे जास्त झाल्यावर उडवायचे कसे? तर असे…”
“एवढा रिकामा वेळ लोकांना असतो तरी कधी…”
“अभिनंदन माऊ! श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा आपणास एक गोंडस बाळ देवो हीच प्रार्थना”
“लोकं एवढे फुकट झाले आहेत हे आज कळाले. कंटेंटसाठी काय पण…”
“चला उंदीर वाढायला घ्या पटकन, पाहुण्यांना भूक लागली असेल…”
अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या असून व्हिडीओवर हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.
प्राणी म्हणजे ‘कुटुंब’
आजवर आपण श्वान-मांजरींच्या वाढदिवसाच्या पार्ट्या, डॉग शो, पेट परेड पाहिल्या असतील. पण पाळीव प्राण्यांसाठी आयोजित केलेले डोहाळजेवण ही खरंच विलक्षण कल्पना आहे. यामुळे प्राण्यांबद्दल असलेले आपले प्रेम, त्यांना दिला जाणारा सन्मान आणि घरातील सदस्याप्रमाणे त्यांची काळजी घेण्याची संस्कृती अधोरेखित होत आहे.