
माणदेश एक्सप्रेस न्यूज | हेल्थ डेस्क
लालसर, गुलाबी दाण्यांनी सजलेलं डाळिंब हे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. दाबेली, भेळ, कोशिंबीर, रायता, साबुदाण्याची खिचडी अशा अनेक पदार्थांची चव खुलविण्यासाठी डाळिंब हमखास वापरले जाते. मात्र फक्त दाणेच नव्हे, तर डाळिंबाचे साल देखील तितकेच गुणकारी आहे. त्यामध्ये ॲण्टी-ऑक्सिडंट्स, ओमेगा ६, फायबर, लोह, झिंक, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि के यांसारखी मौल्यवान तत्त्वे असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यापासून ते सौंदर्य वाढविण्यापर्यंत डाळिंबाच्या सालींचा वापर फायदेशीर ठरतो.
अनेक जण डाळिंब खाल्ल्यानंतर त्याचे साल लगेच फेकून देतात. पण हे साल वाळवून, त्याची पावडर करून किंवा काढा बनवून वापरल्यास त्यातून अनेक आजारांवर आणि सौंदर्य समस्यांवर उपाय होऊ शकतो. चला तर मग पाहूया डाळिंबाच्या सालींचे ६ अनोखे फायदे—
१. त्वचेची नितळता आणि चमक वाढवते
डाळिंबाच्या साली उन्हात वाळवून पावडर तयार करावी. या पावडरमध्ये गुलाबजल घालून फेसमास्क बनवून चेहऱ्यावर लावल्यास डेडस्किन, व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स नष्ट होतात. त्वचा स्वच्छ, तजेलदार व नितळ दिसते.
२. दही आणि डाळिंब सालींचा फेसपॅक
आठवड्यातून तीन वेळा डाळिंबाच्या सालींची पावडर आणि दही मिसळून फेसपॅक लावल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
३. तोंडातील दुर्गंधी घालवते
ज्यांच्या तोंडातून नेहमी दुर्गंधी येते त्यांनी डाळिंबाच्या सालींची पावडर पाण्यात टाकून त्याने गुळण्या कराव्यात. रोज सकाळी हा उपाय केल्यास दिवसभर तोंड ताजेतवाने राहते.
४. खोकला आणि पोटाच्या तक्रारींवर उपाय
डाळिंबाच्या सालींचा काढा बनवून पिल्यास खोकला, जुलाब, पोटातील जंत अशा तक्रारींवर लवकर आराम मिळतो.
५. कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवते
डाळिंबाच्या सालांची पावडर पाण्यात घालून उकळून काढा बनवून प्यायल्यास कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी हा उपाय उपयुक्त ठरतो.
६. चेहऱ्यावरील वांगाचे डाग कमी करते
ज्यांच्या चेहऱ्यावर हायपर पिगमेंटेशन किंवा वांगाचे डाग आहेत त्यांनी डाळिंबाच्या सालींची पावडर आणि थोडेसे जायफळ एकत्र करून त्या डागांवर लावावे. काही दिवस नियमित वापरल्यास डाग कमी होऊन चेहरा उजळतो.
👉 तज्ज्ञांचा सल्ला : डाळिंबाचे साल घरी वापरताना ते स्वच्छ धुऊन, उन्हात चांगले वाळवूनच वापरावे.
असा हा दिसायला साधा पण आरोग्य आणि सौंदर्यासाठी अमूल्य ठरणारा उपाय! त्यामुळे आता डाळिंब खाल्ल्यानंतर त्याचे साल फेकून देऊ नका, तर त्याचा योग्य वापर करा.