
माणदेश एक्सप्रेस न्यूज | कोल्हापूर :
व्यापारातील विश्वासाचा गैरफायदा घेत सांगलीतील एका बेदाणे व्यापाऱ्याची तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खऱ्या नोटांखाली त्याच आकाराचे कोरे कागद ठेवून हा गंडा घातला गेला. सात ऑगस्ट रोजी कोल्हापूरमधील एलेक्झा टॉवर येथे घडलेल्या या घटनेची फिर्याद बुधवारी (दि. २०) शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
फिर्यादी राजेश लक्ष्मीनारायण मुंदडा (वय ५४, रा. अंबाईनगर, सांगली) हे बेदाण्याचे मोठे व्यापारी आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघा अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘दिल्लीतील व्यवहारासाठी पैसे द्या’ म्हणत ओळख वाढवली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंदडा यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. तो स्वतःला दिल्लीतील ‘राहुल’ म्हणून सांगत होता. बेदाणे खरेदीच्या बहाण्याने त्याने व्यापाऱ्याशी बोलणे सुरू केले. काही दिवसांतच ओळख वाढवत त्याने विश्वास संपादन केला.
यानंतर त्याने व्यापारासाठी दिल्लीत ५० लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. तुमच्या दिल्लीतील व्यापारी मित्रांकडून ती रक्कम द्या, बदल्यात मी तुम्हाला कोल्हापुरातील माझ्या मित्राकडून तितकीच रोकड पोहोचवतो, असे तो म्हणाला.
कोल्हापुरात कर्मचारी पाठवले, पण हातात आले कोरे कागद
त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुंदडा यांनी दिल्लीतील एका व्यापारी मित्राकडून ५० लाख रुपयांची व्यवस्था करून दिली. त्यानंतर ठरल्यानुसार त्यांना कोल्हापुरातील एलेक्झा टॉवर येथे रक्कम घ्यायला सांगण्यात आले. एका मोबाईल क्रमांकासह संपर्कासाठी व्यक्तीची माहिती देण्यात आली.
सात ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंदडा यांचे कर्मचारी ठरलेल्या ठिकाणी गेले. तिथे एका व्यक्तीने प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली रक्कम, बँकेचा शिक्का व पावतीसह दिली. बाहेरून ती खऱ्या नोटांचे बंडल असल्याचा भास होत होता. कर्मचारी रक्कम घेऊन सांगलीला परतले.
मात्र व्यापारी मुंदडा यांनी जेव्हा बंडल उघडून पाहिले तेव्हा खऱ्या नोटांखाली कोऱ्या कागदांचे गठ्ठे ठेवले असल्याचे उघडकीस आले.
मोबाईल बंद; १४ दिवसांनी पोलिसांत धाव
घटनेनंतर व्यापारी मुंदडा यांनी पैसे देणाऱ्या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु व्यवहार झाल्यानंतर तिन्ही मोबाईल नंबर त्वरित स्विच ऑफ करण्यात आले होते. फसवणुकीचा प्रकार स्पष्ट झाल्यानंतर काही दिवस तपास करून शेवटी त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात २० ऑगस्ट रोजी फिर्याद दाखल केली.
पोलिस तपास सुरू
या फसवणुकीत वापरलेल्या तीन मोबाईल नंबरचा तपास सुरू असून ते अद्याप बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. एलेक्झा टॉवरमध्ये पैसे देणारी व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तिचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिस करत आहेत.
या प्रकारामुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून, व्यापारातील रोकड व्यवहार किती धोकादायक ठरू शकतात याचे हे उदाहरण ठरले आहे.