
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई, २० ऑगस्ट:
मुंबई, पुणे, नागपूर आणि नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या संकटाबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राऊतांनी प्रत्यक्षात परिस्थितीचे जबाबदार कोण आहेत हे स्पष्ट केले.
राऊत म्हणाले, “काल मुंबई बुडाली, पुणे बुडालं, नागपूर बुडतय, नांदेड बुडालं. याला जबाबदार कोण? नगरविकास मंत्री शेगदाणे खात छत्री घेऊन फिरत होते, मोनोरेल बंद पडली, लोक अडकले. यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं शासन जबाबदार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हाहाकार उडाला.”
उपराष्ट्रपती निवडणूक आणि हुकूमशाहीवर टीका
संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भातही विधान केले. ते म्हणाले, “राधाकृष्णन हे राज्यपाल म्हणून संविधानाचे प्रमुख आहेत, तरीही झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनात ईडीने अटक केली होती. अशा प्रकारची घटना घडताना राज्यपालांनी हस्तक्षेप का केले नाही? आमची लढाई हुकूमशाही प्रवृत्ती आणि संवैधानिक पदावरील अशा समर्थनांविरुद्ध आहे.”
विरोधी पक्षाला घाबरण्यासाठी कायदे आणले जातात
राऊतांनी विरोधी पक्षावर दबाव आणण्यासाठी कायदे कसे वापरले जात आहेत, यावरही भर दिला. ते म्हणाले, “जर एखाद्याला अटक केली तर ३० दिवसांत राजीनामा द्यावा लागतो. हा कायदा विरोधी पक्षांच्या सरकारांवर दहशत निर्माण करण्यासाठी आहे. महाराष्ट्रातील मंत्री, पूर्व मुख्यमंत्री तुरुंगात गेले पाहिजेत का? अमित शाह, संजय शिरसाट, संजय राठोड, गिरीश महाजन यांच्यावर कारवाई केली जाईल का?”
मतचोरी संदर्भात राहुल गांधींवर पाठबळ
राऊत म्हणाले, “राहुल गांधी यांनी मतचोरी संदर्भात निवडणूक आयोगाविरोधात वणवा पेटवला आहे. यामुळे भविष्यात मतचोरी करून निवडणुका जिंकता येणार नाहीत. विरोधी पक्षांच्या सरकारांना भाजपात आणण्यासाठी कायदे आणले जात आहेत. हे हुकूमशाहीचं शेवटचं शिखर आहे.”
साधनसुचिता आणि नैतिकतेवर जोर
राऊतांनी मोदी सरकारच्या नैतिकतेवरही टीका केली. ते म्हणाले, “पंतप्रधानांवर देश लुटल्याचा आरोप आहे. मित्राला देश लुटून दिला आहे. त्यावर गुन्हा दाखल करा. कायदा आणताना राजकारणात साधनसुचिता, नैतिकता राहावी, म्हणून कायदा आणला आहे. गेल्या दहा वर्षात साधनसुचिता आणि नैतिकतेची त्यांनी काटेकोरपणे पालन केले आहे का?”
५० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
राऊतांनी मोठा आरोप करत म्हटले, “ज्या सरकारमध्ये संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे मंत्री आहेत, त्यांच्याविरोधात ५० हजार कोटींच्या घोटाळ्याचा पुरावा मी अमित शाह यांना दिला आहे.”
आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि जबाबदारी
पत्रकारांच्या प्रश्नावर की “एकनाथ शिंदे दिवसभर फिरत होते, आदित्य ठाकरे मात्र वरळीच्या बाहेर गेले नाहीत?” यावर राऊत म्हणाले, “तुम्हाला काय माहित, तुम्ही बसून बोलताय. काल अख्खी शिवसेना रस्त्यावर होती. ठाकरे म्हणजे शिवसेना. उद्धव-आदित्य ठाकरे मुंबईसह महाराष्ट्रातील शिवसैनिकांना मदतीसाठी यंत्रणा राबवत होते. वरळी हा त्यांचा मतदारसंघ आहे. आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांची काळजी घेणं त्यांची जबाबदारी आहे.”
सरकार कोणाची आहे?
शेवटच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, “सगळ्यात आधी जबाबदारी नगरविकास मंत्र्यांची आहे. सरकार कोणाची आहे? सरकार ठाकरेंच आहे का? नाही, सरकार शिंदे, फडणवीस आणि पवारांचे आहे.”