
माणदेश एक्सप्रेस न्यूज | सांगली :
सांगलीकरांसाठी पुन्हा एकदा कृष्णा नदीने धोक्याची घंटा वाजवली आहे. कोयना व वारणा धरणातून सोडण्यात आलेल्या वाढीव विसर्गासोबत सलग बरसणाऱ्या पावसामुळे बुधवारी सकाळी आठ वाजता कृष्णा नदीची पाणीपातळी तब्बल ३४ फूटांवर पोहोचली. यामुळे नदीची पातळी ‘इशारा पातळी’कडे सरकत असून शहर व परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
नदीकाठच्या भागात पाणी शिरलं
सूर्यवंशी प्लॉट व इनामदार प्लॉट परिसरात नदीचं पाणी घरामध्ये शिरलं असून नागरिकांना रात्रीतून सुरक्षित स्थळी हलवावं लागलं. सांगली महापालिका प्रशासनाने तातडीने स्थलांतर मोहिम सुरू केली. मंगळवारी उशिरा रात्री आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि उपआयुक्त निखिल जाधव यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्त भागाची पाहणी करत नागरिकांना तातडीने घरं सोडण्याच्या सूचना दिल्या.
त्याअंतर्गत सूर्यवंशी प्लॉटमधील ९ कुटुंबांतील ५० नागरिक आणि आरवाडे पार्कमधील १० कुटुंबांतील ७७ नागरिक अशा एकूण १२७ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
अमरधाम स्मशानभूमी पाण्याखाली
कृष्णा नदीच्या वाढत्या पाण्याचा थेट फटका अमरधाम स्मशानभूमीला बसला. बुधवारी सकाळी स्मशानभूमीपर्यंत पुराचे पाणी पोहोचले. परिणामी येथील दहनविधी पूर्णपणे बंद करावे लागले. महापालिकेने पर्याय म्हणून कुपवाड स्मशानभूमी येथे अंत्यविधीची व्यवस्था केली आहे. अचानक स्मशानभूमी पाण्याखाली गेल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
प्रशासनाकडून आवाहन
सध्या नदीची पाणीपातळी ३४ फूटांवर असून इशारा पातळी अवघी ४० फूटांवर आहे. पाण्याची वाढ कायम राहिल्यास आणखी भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. महापालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, नदीकाठच्या भागात अनावश्यक गर्दी टाळण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाने बचाव पथके व आपत्कालीन सेवा सतर्क ठेवली आहेत.
भीतीचं सावट कायम
सलग पावसामुळे नदीकाठच्या नागरिकांना असुरक्षिततेची जाणीव सतावत आहे. दरवर्षी पूराचा फटका बसणाऱ्या या भागात यंदाही पाणी शिरल्याने भीतीचं सावट गडद झालं आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करून दिलासा दिला असला तरी नदीपातळीतील चढ-उतार लक्षात घेता आगामी काही दिवस सांगलीकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.