
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | कोल्हापूर :
आजच्या डिजिटल युगात तरुणाई सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी झटत असताना त्यातून गंभीर अपघात घडल्याचे दुर्दैवी चित्र कोल्हापूरात समोर आले आहे. इन्स्टाग्रामवर रील बनवण्यासाठी साडी आणण्याकरिता वर्गमित्रासोबत दुचाकीवर निघालेल्या १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा सिमेंट मिक्सर ट्रकच्या भीषण धडकेत मृत्यू झाला. हा हृदयद्रावक प्रकार बुधवारी रात्री सोन्या मारूती चौकातील भगतसिंग तरुण मंडळाजवळ घडला.
मृत विद्यार्थिनीचे नाव श्रेया महेश देवळे (वय १९, मूळ गाव : उंब्रज, ता. कराड, जि. सातारा, सध्या रा : साळोखेनगर, कळंबा रिंगरोड, कोल्हापूर) असे असून ती इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती.
घटनेचा सविस्तर तपशील
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेया मैत्रिणीसोबत कोल्हापूरात शिक्षणानिमित्त वास्तव्यास होती. बुधवारी रात्री ती वर्गमित्र ओम संदीप पाटील (वय १९, रा. प्रथमेशनगर, कळंबा रिंगरोड, कोल्हापूर) याच्यासोबत गंगावेश परिसरात मावशीच्या घरातून साडी आणण्यासाठी गेली होती.
रील बनवण्यासाठी लागणारी साडी घेतल्यानंतर ओम दुचाकीवर श्रेयाला बसवून परत सोन्या मारुती चौकात आला. त्यावेळी रात्री साधारण साडेदहाच्या सुमारास मागून आलेल्या रेडीमिक्स काँक्रीट ट्रक चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करून अचानक डावीकडे वळण घेतले. यात ट्रकच्या पाठीमागील डाव्या चाकाखाली दुचाकी आदळली. धडक बसताच ओम व श्रेया रस्त्यावर फेकले गेले.
परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमी दोघांना तातडीने उचलून सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच श्रेयाचा मृत्यू झाला. दुचाकी चालक ओम जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
चालक पळाला; पोलिसांचा शोध सुरू
अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली. नागरिकांनी जखमी विद्यार्थ्यांना मदत केली. मात्र या संधीचा फायदा घेत ट्रक चालक अपघातस्थळावरून पसार झाला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.
अचानक उघडलेले मृत्यूचे दार
अजून शिक्षण सुरू असताना वयाच्या केवळ १९व्या वर्षी श्रेयाला आपला जीव गमवावा लागला. सोशल मीडियासाठी रील बनवण्याच्या हेतूने सुरु झालेला हा प्रवास थेट मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचला. कुटुंबीय व मैत्रिणींसाठी हा प्रकार अत्यंत धक्कादायक ठरला आहे.
स्थानिकांमध्ये संताप
घटनेनंतर परिसरातील नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी कोल्हापूरातील रस्त्यांवरून वेगाने जाणाऱ्या मोठ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.