आटपाडी नगरपंचायतीतर्फे स्वच्छता व सुशोभीकरण मोहीम संपन्न

0
253

२ टन कचरा संकलन, पुराणकालीन बारव व शुक्र ओढ्याचे पुनर्जीवन, हरित रक्षाबंधनाचे आयोजन

माणदेश एक्सप्रेस न्यूज

आटपाडी/प्रतिनिधी :  जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आणि प्रशासक तसेच मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, आटपाडी नगरपंचायत मार्फत शहर स्वच्छता व सुशोभीकरण मोहीम दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी भव्यदिव्य पद्धतीने राबविण्यात आली. “स्वच्छ शहर – आपला अभिमान” हा संदेश देत, शहरातील विविध भागात सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत ही मोहीम जोमात पार पडली.

मोहिमेची सुरुवात नगरपंचायत कार्यालयापासून करण्यात आली. प्रथम शहरातील ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा असलेल्या शुक्र ओढ्याची साफसफाई व पुनर्जीवनाचे काम करण्यात आले. यानंतर पुराणकालीन बारव स्वच्छ करून परिसराचा सुशोभीकरण उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छतेसोबतच पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी अंबाबाई मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

संपूर्ण मोहिमेत शहरातील प्रमुख रस्ते, गल्लीबोळ, धार्मिक स्थळे व सार्वजनिक जागांची साफसफाई करण्यात आली. प्लास्टिक कचरा, गवत, माती व इतर घाण जमा करून एकूण २ टन कचरा संकलित करण्यात आला व तो थेट कचरा संकलन केंद्रावर पाठविण्यात आला.

या उपक्रमात डॉक्टर असोसिएशन, सामाजिक कार्यकर्ते, विविध व्यवसायिक संघटना, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, प्रतिष्ठित नागरिक तसेच नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. सफाई कर्मचारी वर्गानेही पहाटेपासून मेहनत घेत शहर स्वच्छतेसाठी योगदान दिले.

कार्यक्रमाचा समारोप अंबाबाई मंदिर येथे करण्यात आला. या ठिकाणी तहसील कार्यालयाच्यावतीने नायब तहसीलदार दादासाहेब पुकळे यांच्या हस्ते हरित रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला. यात बहिणींनी भावंडांच्या रूपात वृक्षांना राखी बांधत पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.

मोहिमेत आरोग्य विभाग प्रमुख अमरसिंह बंडगर, बांधकाम अभियंता गिरीश शेंडगे, लेखापाल राम कांबळे, लेखापाल अक्षता परीट, कर निरीक्षक भाग्यश्री सदाकळे, पाणीपुरवठा अभियंता कोमल वावरे, सुधीर भिंगे, आबासो माळी आदींसह नगरपंचायतीच्या विविध विभागांचे प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपंचायतीकडून यावेळी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. “आपले शहर आपली जबाबदारी” या संकल्पनेतून पुढील काळातही नागरिकांनी कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी आणि पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

आटपाडी नगरपंचायतीची ही मोहीम केवळ एकदिवसीय उपक्रम न ठरता, सतत चालणाऱ्या स्वच्छता चळवळीचा भाग व्हावी, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here