
माणदेश एक्सप्रेस न्यूज
तासगाव : तुरची (ता. तासगाव) येथील सरपंच विकास डावरे यांनी गावासाठी स्वतंत्र तलाठी नेमावा, या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, तब्बल अकरा महिने उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर त्यांनी अनोखा मार्ग अवलंबला. शनिवारी सरपंच डावरे यांनी गावातील मध्यवर्ती ठिकाणी ‘गाढवांची पूजा’ करून प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध नोंदवला.
गावात स्वतंत्र तलाठी नसल्याने नागरिकांना दाखले, उतारे, प्रमाणपत्रे व इतर शासकीय कागदपत्रांसाठी त्रास सहन करावा लागतो. सध्या तलाठी हे तीन-चार गावांसाठी नियुक्त असून, तुरचीतील लोकांना कामासाठी त्यांना दुसऱ्या गावात शोधावे लागते. यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो, तसेच कधी कधी कामासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागते. या गैरसोयीबाबत सरपंच डावरे यांनी मागील वर्षी लेखी निवेदन दिले होते. तथापि, अकरा महिन्यांच्या कालावधीतही मागणीवर काहीच कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
यावर लक्ष वेधण्यासाठी सरपंच डावरे यांनी शनिवारी गावात गाढवांसमोर नारळ फोडून, अगरबत्ती लावून आणि त्यांच्याशी संवाद साधत निवेदन वाचून दाखवले. त्यांनी प्रतीकात्मक भाषेत ‘गाढवांनाही सांगून पाहतो, कदाचित ते तरी आपली मागणी ऐकतील’ असा टोला प्रशासनाला लगावला. या वेळी ग्रामस्थ उपस्थित होते आणि त्यांनीही प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल रोष व्यक्त केला.
डावरे यांनी सांगितले की, “तुरची हा लोकसंख्या आणि भौगोलिकदृष्ट्या मोठा गाव असून, येथे शेतकरी, विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी वारंवार त्रास सहन करावा लागतो. स्वतंत्र तलाठी नेमल्यास ही समस्या सुटेल, मात्र मागणी असूनही कारवाई होत नाही, हे दुर्दैवी आहे.”
या आंदोलनामुळे गावात चर्चेला उधाण आले असून, ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करून तुरचीसाठी स्वतंत्र तलाठी नेमावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. याबाबत पुढील काही दिवसांत प्रशासनाने भूमिका स्पष्ट न केल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा सरपंच डावरे यांनी दिला आहे.