“सातबारा कोरा होईपर्यंत शिवसेनेची कर्जमुक्ती दिंडी थांबणार नाही – बानगुडे-पाटील”

0
49

माणदेश एक्सप्रेस न्यूज | कोल्हापूर –

“सत्तेच्या सारीपाटात निवडणुका आल्या कीच शेतकरी राजा होतो. महायुती सरकारने बड्या उद्योगपतींची कर्जे माफ केली; मात्र जगाच्या पोशिंद्याकडे दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय शिवसेना मागे हटणार नाही,” असा ठाम इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांनी दिला.

रवळनाथ मंदिरातून ‘शेतकरी कर्जमुक्ती दिंडी’ला आज (सोमवार) सकाळी विधिवत प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना बानगुडे-पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांत ७६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अधिकृत नोंद असून, हे आकडे सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचे भीषण चित्र दर्शवतात.

सरकारला ‘पाझर’ फोडेपर्यंत आंदोलन सुरूच

बानगुडे-पाटील म्हणाले, “ज्यांना शेतकऱ्यांची जाण नाही, अशा सरकारला जाग आणण्यासाठीच ही कर्जमुक्ती दिंडी निघाली आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही, तोपर्यंत शिवसेना मागे हटणार नाही. शेतकरी भरडला जात असताना कृषिमंत्री मात्र रमी खेळण्यात वेळ घालवत आहेत, ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी बाब आहे.”

त्यांनी महायुती सरकारवर सडकून टीका करताना म्हटले की, “कर्जमाफीऐवजी हे सरकार ‘शक्तिपीठ महामार्ग’ करण्यात धन्यता मानत आहे. शेतकऱ्यांच्या नरडीवर पाय ठेवून जर विकासाच्या गप्पा केल्या जात असतील, तर आम्ही कधीच शांत बसणार नाही.”

मान्यवरांची उपस्थिती

या दिंडीच्या प्रारंभ सोहळ्यास संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, रविकिरण इंगवले, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, रियाज शमनजी, राजू रेडेकर, विष्णू गावडे, महेश पाटील, महादेव गुरव, शांता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनीही या आंदोलनाची पार्श्वभूमी स्पष्ट करत सरकारला शेतकरीविषयक धोरणे तात्काळ बदलण्याचा इशारा दिला.

पूजन व शहरातून मार्गक्रमण

दिंडी रथाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रवळनाथ देवतेला साकडे घालून “सरकारला शेतकरी कर्जमुक्तीची सद्बुद्धी येवो” अशी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर दिंडीने शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

ही दिंडी पुढील काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून मार्गक्रमण करणार असून, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी तीव्र लढा उभारला जाणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here