
माणदेश एक्सप्रेस न्यूज|पुणे :-
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या वाहतूककोंडी आणि वाढत्या गुन्हेगारीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष केंद्रित केले असून, प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात पुणे पोलिस दलाच्या विविध योजनांचे उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम शुक्रवारी (दि. ८) आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
याच वेळी अजित पवारांनी स्टेजवरूनच इक्बाल चहल यांना थेट उद्देशून कठोर शब्दांत सूचना दिल्या. “चहल, मला ते परत सांगायला लावू नका. माझी विनंती आहे,” असे त्यांनी ठामपणे म्हटले. त्यांच्या या विधानाने काही क्षणांसाठी कार्यक्रमस्थळी एकदम शांतता पसरली आणि साऱ्यांचे लक्ष त्यांच्या वक्तव्याकडे लागले.
बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या इमारतीवरून नाराजी
अजित पवार म्हणाले, “पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेले बंडगार्डन पोलिस ठाणे हलवण्याचा आदेश आधीच निघाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः याबाबत सूचना दिल्या होत्या. तरीही काम अजून झालेलं नाही. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना विचारले असता त्यांनी सांगितले की फाइल वर गेली आहे, आणि वर म्हणजे चहल यांच्याकडे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर मार्गी लावा.”
औंध पोलिस इमारती आणि रस्ता रुंदीकरणाचा मुद्दा
हिंजवडी येथील रस्ता रुंदीकरणाबाबत बोलताना पवार म्हणाले, “जेव्हा आम्ही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू केले, तेव्हा लोकांनी प्रश्न केला की, इतरांची बांधकामे काढता, पण औंध पुलाच्या पुढे पोलिसांच्या दोन इमारती अजूनही तशाच आहेत. कित्येक महिने उलटून गेले तरी या इमारती हटवण्यात आलेल्या नाहीत. वेळ काढा, मान्यता द्या, म्हणजे पुण्यातील वाहतूककोंडी काहीशी कमी होईल.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “आम्ही जी कामे सांगतो ती केवळ सार्वजनिक हितासाठी असतात, वैयक्तिक फायद्यासाठी नाहीत. त्यामुळे अशा कामांना विलंब लावणे योग्य नाही.”
गुन्हेगारीवर कठोर इशारा
वाहतूककोंडीप्रमाणेच वाढत्या गुन्हेगारीवरही पवारांनी कठोर भूमिका घेतली. “पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात टोळक्यांकडून कोयते उगारून दहशत माजवण्याचे प्रकार वाढले आहेत. वाहनांची तोडफोडही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अशा कृत्यांचा बंदोबस्त करायलाच हवा,” असे ते म्हणाले.
मात्र, अशा प्रकारातील आरोपी बहुतेक अल्पवयीन असल्याने विद्यमान कायद्यांनुसार त्यांना कठोर शिक्षा करणे अवघड जाते, हेही त्यांनी नमूद केले. “यावर तोडगा म्हणून कायद्यात बदल करता येईल का? किंवा नवीन कायदा आणता येईल का, यावर विचार करण्याची गरज आहे. ही विकृती संपवणे हे आपले कर्तव्य आहे,” असे सांगून त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून ठोस सूचना मागवल्या.
मंचावरच प्रशासनाला अल्टिमेटम
या संपूर्ण भाषणादरम्यान पवारांनी आपला नेहमीसारखा स्पष्टवक्तेपणा दाखवत थेट मंचावरूनच प्रशासनाला अल्टिमेटम दिला. “आम्ही दिलेली कामे वेळेत पूर्ण व्हायलाच हवीत. सार्वजनिक कामांमध्ये अडथळा आणणाऱ्यांना मी थांबवणार नाही,” असे ते म्हणाले.
पुण्यातील वाढत्या वाहतूककोंडी, पायाभूत सुविधांची गरज आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर पवारांचे हे भाषण म्हणजे प्रशासनाला थेट दिलेला इशारा मानला जात आहे. आगामी महिन्यांत या विषयांवर तातडीने कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.