
माणदेश एक्सप्रेस न्यूज :-
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या आसनव्यवस्थेवरून राजकीय वाद पेटला आहे. सहाव्या रांगेत बसलेले उद्धव ठाकरे यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांनी “कुठे गेला ठाकरे ब्रँड?” असा सवाल उपस्थित केला. मात्र, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांचा ठामपणे बचाव केला आणि सत्ताधाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.
काय आहे आसनव्यवस्थेचा वाद?
गुरुवारी रात्री लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसाठी खास डिनर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या वेळी त्यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचे गंभीर आरोप करत पावर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले. या बैठकीत उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्यासह हजर होते.
मात्र, उद्धव ठाकरे हे सहाव्या रांगेत बसलेले दिसल्याने सत्ताधाऱ्यांनी लगेच टीका सुरू केली. काहींनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत, “पूर्वी पहिल्या रांगेत असलेले ठाकरे आता मागच्या रांगेत गेले, ब्रँड कुठे गेला?” अशी खिल्ली उडवली.
शरद पवारांचा प्रतिकार
आज नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले,
“काल राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. मी त्यात होतो. मी स्वतः, फारुख अब्दुल्ला, उद्धव ठाकरे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत बसलो होतो. प्रेझेंटेशन बघताना पहिल्या रांगेत कोणी बसत नाही, जसं सिनेमा बघायला जाताना आपण स्क्रिनजवळ बसत नाही, तसंच आम्ही मागे बसलो होतो. उद्धव ठाकरे कुठे बसले हा मुद्दा करून कारण नसताना चर्चेचं कारण बनवलं गेलं. याला काहीही महत्त्व नाही.”
राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर पवारांची भूमिका
पवारांनी यावेळी राहुल गांधींनी केलेल्या निवडणूक आयोगावरच्या आरोपांवरही भाष्य केलं.
“राहुल गांधींनी आयोगावर केलेले आरोप गंभीर आहेत. त्यांची सखोल चौकशी व्हायला हवी. राहुल गांधींनी विचारलेले प्रश्न आयोगानेच उत्तरले पाहिजेत, भाजपने नव्हे. राहुल गांधींकडून एफिडेविट मागणं योग्य नाही,” असं पवारांनी स्पष्ट केलं.
स्थानिक निवडणुकांबाबत संकेत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत विचारलं असता पवार म्हणाले,
“महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आम्ही अद्याप चर्चा केलेली नाही. प्रत्येक पक्षाची मतं मांडली जातील आणि त्यावर एकवाक्यता साधण्याचा प्रयत्न केला जाईल.”
राजकीय पाश्र्वभूमी
उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट सध्या सत्ताधाऱ्यांच्या सततच्या हल्ल्यांचा सामना करत आहे. शिंदे गटाने शिवसेनेतील बंडानंतर पक्षचिन्ह आणि नाव मिळवल्यानंतर उद्धव ठाकरे विरोधी पायंडा कायम ठेवला आहे. दिल्लीतील आसनव्यवस्थेचा मुद्दा हा देखील याच राजकीय वैरातून उचलला गेला असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे.