
माणदेश एक्सप्रेस न्यूज :-
इंडिया आघाडीच्या दिल्ली बैठकीत शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बसण्याच्या जागेमुळे निर्माण झालेल्या वादाने राजकीय वातावरण तापले आहे. एका व्हायरल फोटोत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे मागील रांगेत बसलेले दिसताच शिंदे गटाने सोशल मीडियावर टीकेची झोड उठवली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी ही टीका “अतिशय बालिश” असल्याची प्रतिक्रिया दिली.
शिंदे गटाची चिमटे आणि ‘ट्विट वॉर’
दिल्लीतील अलीकडील इंडिया आघाडी बैठकीत राहुल गांधी यांनी मतांची चोरी व हेराफेरीबाबत भाष्य केले. पण या भाषणापेक्षा जास्त चर्चेत राहिला तो बसण्याचा क्रम. व्हायरल झालेल्या फोटोवरून शिंदे गटाने उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करत ट्विट वॉर सुरू केली. काहींनी “मागच्या बाकावर बसलेले नेते” असा टोला मारला.
सुप्रिया सुळे यांची प्रतिवादक भूमिका
या वादावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या,
“उद्धव ठाकरे यांच्यावर होणारी टीका अतिशय हास्यास्पद आणि बालिश आहे. ती बैठक इनफॉर्मल गेट-टुगेदर होती. कोणी कुठे बसलं याची ठराविक व्यवस्था नव्हती. अखिलेश यादव दुसऱ्या रांगेत होते, पवार साहेब तिसऱ्या-चौथ्या रांगेत. तो सरकारी कार्यक्रम नव्हता, फक्त सहकुटुंब जेवण्यासाठी आमंत्रण होतं. उलट उद्धवजी सर्वात चांगल्या जागी बसले होते — स्क्रीनपासून योग्य अंतरावर, अगदी मधोमध.”
सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांच्या प्रतिवादालाही पाठिंबा दिला. राऊत यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना “गांडूळ” अशी उपमा देत प्रत्युत्तर दिलं होतं.
राहुल गांधींच्या टीकेवरून भाजपवर सवाल
बैठकीत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतांची चोरीचा आरोप केला होता. त्यावर भाजप नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. यावर सुळे म्हणाल्या,
“निवडणूक आयोग स्वायत्त असेल, तर भाजप एवढं पर्सनल का घेतंय? राहुल गांधी यांनी आयोगावर आरोप केले, मग उत्तर भाजप का देते?”
पंतप्रधान मोदींना पैठणी भेट
काल हँडलूम डे निमित्त सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मल्लिकार्जून खर्गे आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. मोदींना महाराष्ट्राची खास पैठणी भेट देत त्यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी केली. “या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.