
तासगाव : तासगाव तालुक्यातील मांजर्डे गावाच्या बाराआंबा परिसरात एकाकी राहणाऱ्या ५० वर्षीय अनिता पोपट मोहिते या महिलेचा डोक्यावर वार करून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (दि.७) रात्री उशिरा हा प्रकार समोर आला असून, प्राथमिक अंदाजानुसार दोन दिवसांपूर्वीच घातपात झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या खून प्रकरणामुळे परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे.
एकटेपणात आयुष्य, पतीचे निधन आणि मुलगी मुंबईत
मांजर्डे गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर बाराआंबा परिसरात अनिता मोहिते एकट्याच वास्तव्यास होत्या. आजूबाजूला फारशी लोकवस्ती नसल्याने त्या जवळपास एकांतातच राहात होत्या. त्यांच्या पतीचे अनेक वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना एक मुलगी असून ती नोकरीच्या कारणास्तव मुंबईत वास्तव्यास आहे.
फोनवर संपर्क न झाल्याने उलगडले प्रकरण
गुरुवारी दिवसभर मुलगी फोनवरून संपर्क साधत होती; मात्र आईचा प्रतिसाद मिळत नव्हता. चिंतेने तिने नात्यातील एका तरुणाला या बाबत कळविले. संबंधित तरुण रात्री अनिता मोहिते यांच्या घरी पोहोचला असता, घरातच त्या मृतावस्थेत पडलेल्या दिसल्या. डोक्यावर गंभीर जखमा असल्याने धारदार किंवा जड वस्तूने वार करून खून झाल्याची शक्यता पक्की झाली.
दुर्गंधीने दिला खुनाचा कालावधीचा इशारा
घरात दुर्गंधी पसरलेली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे किमान दोन दिवसांपूर्वीच हा घातपात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने पंचनामा सुरू केला. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.
गावात भीतीचे सावट
या दुर्दैवी घटनेची बातमी गावात पसरताच मोठी गर्दी घटनास्थळी जमली. बाराआंबा परिसरातील एकांत आणि महिला एकट्याच राहात असल्याने हा खून नेमका कोणत्या हेतूने झाला, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. चोरीसाठी हा प्रकार घडला की वैयक्तिक रागातून, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांचा तपास सुरू
तासगाव पोलिसांनी घटनेनंतर परिसरात चौकशी सुरू केली आहे. घरातील परिस्थिती, मृतदेहाची स्थिती, आणि आसपासच्या लोकांचे जबाब यावरून पोलिस तपासाचा धागा पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. मृतदेह तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, अहवाल आल्यानंतर घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होईल.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून तपास सुरू आहे.